वृत्तसंस्था/ कोलंबो
श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगाने अवघ्या 26 व्या वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने तडकाफडकी घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्याने स्वत: श्रीलंका क्रिकेट बोर्डाला याची माहिती दिली आहे. मर्यादित षटकांच्या (वनडे व टी-20) क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
हसरंगाने डिसेंबर 2020 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तीन वर्षांत त्याला श्रीलंकेच्या संघाकडून केवळ चार कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. हसरंगानं दोन वर्षांपूर्वी एप्रिल 2021 मध्ये घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर त्याला कसोटी संघात फारशी संधी मिळाली नाही. त्यामुळे 15 ऑगस्ट रोजी त्याने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला आपल्या निर्णयाची माहिती दिली. हसरंगाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. येत्या काळात तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी बजावेल, असा विश्वास बोर्डाचे सीईओ अॅशले डीसिल्वा यांनी व्यक्त केला आहे.
कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या हसरंगाची मर्यादित षटकांमधील आकडेवारी मात्र अप्रतिम आहे. वनडे क्रिकेटमध्ये 48 सामन्यांमध्ये 67 विकेट्स घेतल्या आहेत. तर 23.77 च्या सरासरीने 832 धावा केल्या आहेत. यात 4 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच टी-20 मध्ये त्याने 58 सामन्यांमध्ये 91 विकेट्स घेतल्या आहेत.









