जलशुद्धीकरण यंत्र बंद पडून 15 दिवस झाले तरी दुरुस्तीकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
ग्रामपंचायत कार्यालयाच्या केवळ हाकेच्या अंतरावर असलेले पिण्याच्या पाण्याचे जलशुद्धीकरण यंत्र बंद पडून 15 दिवस झाले. तरी ग्रामपंचायतीला दुरुस्ती करायला वेळ नसल्यामुळे नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी शाहूनगर किंवा कंग्राळी खुर्द येथील जलशुद्धीकरण यंत्रावरून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याबद्दल दुरुस्तीसाठी नागरिकांनी कळवूनसुद्धा दुरुस्ती होत नसल्यामुळे तसेच ग्रामपंचायतीच्या या निष्काळजी कारभारामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
कंग्राळी बुद्रुक गावची लोकसंख्या 25 हजाराहून अधिक आहे. ग्रामपंचायत कार्यालयाला लागूनच सदर जलशुद्धीकरण यंत्र बसविले आहे. परंतु सदर यंत्र नादुरुस्त झाल्यास ग्रामपंचायतीने त्वरित दुरुस्ती करून नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्याची व्यवस्था करणे गरजेचे असते. शासन नागरिकांना दररोज पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे म्हणून लाखो रुपये खर्चून यंत्र बसवते. यंत्रामध्ये बिघाड झाल्यास दुरुस्ती करून नागरिकांना दररोज पिण्यासाठी शुद्ध पाणी देणे ही ग्रा. पं.ची जबाबदारी असते. परंतु याची दखल घेतली जात नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अन्य ठिकाणी जलशुद्धीकरण यंत्राकडे फेऱ्या माराव्या लागतात. अन्यथा एखाद्या विहिरीच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागते. परंतु ग्रामपंचायतीला याचे कोणतेच सोयरसुतक नसल्यामुळे नागरिकांतून नाराजीच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.
आणखी एका जलशुद्धीकरण यंत्राची मागणी
गावच्या लोकसंख्येच्या मानाने ग्रा. पं. कार्यालयाच्या बाजूला बसविण्यात आलेले जलशुद्धीकरण यंत्र कुचकामी ठरले आहे. कारण एकच यंत्र असल्यामुळे नंबराप्रमाणे पाणी घ्यावे लागते. यामुळे नागरिकांचा वेळ वाया जात आहे. त्यात बंद पडल्यास परत पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आणखी एक यंत्र बसविल्यास लोकसंख्येच्या मानाने नागरिकांना पाणी मिळणे सुलभ होणार आहे. तसेच एखादे यंत्र नादुरुस्त झाल्यास दुसऱ्या यंत्रावर नागरिकांना पाणी मिळेल. तेव्हा जुन्या ग्रामपंचायतच्या ठिकाणी दुसरे शुद्ध पाण्याचे यंत्र बसविण्याची मागणी करण्यात येत आहे.
24 तास घरोघरी पाणी योजनेचे तीन तेरा
केंद्र शासनाकडून कंग्राळी बुद्रुक गावाला 24 तास घरोघरी नळांना ताजे पाणी मिळण्याच्या योजनेसाठी 8 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. पाईप खोदाई कामाचेही नियोजन नसताना खोदाई करून अनेक पाईप फुटल्यामुळे पाणीपुरवठा खंडित झाला. मरगाईनगर, मसणाई गल्लीतील डांबरीकरण व पेव्हर्सचे रस्ते खोदून, फोडून टाकण्यात आले. तेव्हापासून नऊ-दहा महिने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी सायकली किंवा दुचाकी घेऊन भटकंती करावी लागत आहे. अनेकवेळा वृत्तपत्रातून वृत्तांकन करूनसुद्धा पाणी पुरवठ्यात काही सुधारणा झाली नाही. शुद्ध पाण्याच्या यंत्राची तरी तात्पुरती दुरुस्ती त्वरित करून पिण्याचे पाणी नागरिकांना खंड पडू नये, अशी यंत्रणा सुरू ठेवणे गरजेचे आहे. तेव्हा ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांनी 24 तास घरोघरी पाणी योजना त्वरित सुरू करून नागरिकांना दररोज ताजे पाणी मिळण्याची सोय करण्याची मागणी करण्यात येत आहे.









