अमेरिकेतील दिग्गज कंपनी : भारताला निर्यातीत मोठी झेप घेण्याची संधी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतासाठी निर्यातीच्याबाबतीत एक खुशखबर आहे, जी ‘वॉलमार्ट’कडून देण्यात आली आहे. अमेरिकेतील रिटेल क्षेत्रातील दिग्गज कंपनी वॉलमार्ट आगामी काळात भारताकडून खेळणी, बूट आणि सायकली आयात करणार असल्याची माहिती आहे. या नव्या मागणीमुळे भारताला निर्यातीत उडी घेण्याची संधी प्राप्त होणार आहे.

यासोबतच वॉलमार्ट भारतातून खाद्यपदार्थ, औषधे, दैनंदिन वापराच्या गोष्टी, आरोग्याशी संबंधीत उत्पादने, कपडे, कापड आधी मागवणार असल्याचे समजते. विशेषत: भारत हा काही वर्षापूर्वीपर्यंत खेळण्यांच्याबाबतीत पाहता एकमेव आयातक देश होता, पण आता भारत खेळण्यांच्या उत्पादनात झेप घेत आहे. वॉलमार्टही लवकरच भारताकडून खेळणी आयात करणार आहे. यासह बुट, सायकली यांची आयात करुन त्यांच्या विक्रीसाठी विस्ताराचा कार्यक्रम कंपनी घेणार असल्याचे समजते.
वॉलमार्ट अधिकारी भारतात
वॉलमार्टच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच भारतातील खेळणी निर्मात्यांशी चर्चा केली असून खेळण्यांसंबंधीची गरज, दर्जा याबाबीवर त्यांची सविस्तर चर्चा झाली आहे. 2027 पर्यंत 10 अब्ज डॉलर्सची वार्षिक निर्यात भारताकडून होऊ शकते. सुक्ष्म, लघु, मध्यम क्षेत्रातील भारतातील कंपन्यांना याचा लाभ उठवता येणार आहे.
डीपीआयआयटीची मदत
उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (डीपीआयआयटी) यांच्यामुळे भारतातील खेळणी उत्पादक कंपन्यांना चांगले दिवस पाहायला मिळणार आहेत. देशांतर्गत खेळणी उत्पादनांना जागतिक स्तरावरील विविध देशांना निर्यात करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पुरवठादारांशी संधान साधून देण्यात डीपीआयआयटीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याचे फलदायी परिणाम गेल्या काही वर्षात समोर आले आहेत. एप्रिल ते डिसेंबर 2022 पर्यंतच्या अवधीत भारताने 1017 कोटी रुपयांच्या खेळण्यांची निर्यात केली असून 2013 मध्ये ही निर्यात निव्वळ 167 कोटी रुपयांची होती.
पीएलआय योजना लागू व्हावी
याचदरम्यान सरकार या क्षेत्रातील मागणी लक्षात घेऊन आगामी काळात या खेळणी उत्पादनाकरीता पीएलआय योजना लागू करण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती आहे. असे झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानुसार मेड इन इंडिया उत्पादनांना जगभरातील इतर देशांना पोहचवणे शक्य होणार असून अधिकाधिक कंपन्या खेळणी निर्मितीकडे वळू शकणार आहेत.
आर्थिक वर्ष 2021-22
2601 कोटी रुपयांची खेळणी निर्यात
870 कोटी रुपयांची खेळणी आयात
खेळणी आयातीत जवळपास 70 टक्के घट
खेळण्यांच्या आयातीवर 20 ते 70 टक्के शुल्क








