या अपघातात अन्य सहा मजूरही जखमी झाले
मिरज : मिरजेतील किल्ला भाग येथे सुरू असलेल्या बहुमजली इमारत बांधकामाच्या ठिकाणी अंगावर भिंत कोसळल्याने कर्नाटकातील बांधकाम मजूर जागीच ठार झाला. या अपघातात अन्य सहा मजूरही जखमी झाले. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
भीमाप्पा सिद्धाप्पा मेटलकी (45 रा. ब्याकेरी ता. रायबाग) असे अपघातात मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. केदारी निंगनूर (रा. सोरटी, ता. रायबाग) या मजुराची प्रकृती गंभीर आहे. मायाप्पा भूपाल बदामी (36 रा. सोरटी, ता. रायबाग), भीमाप्पा रायाप्पा पाटील (48 रा. कब्बूर ता. चिकोडी), मुत्त्यापा लगमान्ना माळेकर (30 रा. ब्याकेरी ता. रायबाग), बिराप्पा सत्यप्पा करगणी (35 रा. सोरटी, ता. रायबाग), सहदेव यमनाप्पा मदार (35 रा. शहापूर ता. हुक्केरी) हे मजूर जखमी आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिरज शहर पोलिसांनी पंचनामा केला असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
घटनास्थळावरून माहितीनुसार, किल्ला भाग येथे कासीम मणेर यांच्या बहुमजली इमारत प्रकल्पाचे बांधकाम सुरू होते. तळघरात मजूर काम करत असताना त्यांच्या अंगावर भिंत कोसळली. यामध्ये कामगार अडकून पडले. अडकलेल्या जखमी कामगारांना बाहेर काढून उपचारासाठी शासकीय रुग्णालय दाखल करण्यात आले. मात्र गंभीर जखमी असलेल्या एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अन्य सहा कामगार जखमी आहेत त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.
दरम्यान या घटनेनंतर, कामगार नेते डॉ. महेशकुमार कांबळे यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. घटनास्थळी पाहणी करून मजुरांसाठी कन्स्ट्रक्शन कंपनीने कोणत्या सुरक्षा उपयोजना केल्या आहेत याची पाहणी केली. यामध्ये संबंधित बांधकाम मजुरांसाठी कंपनीच्या मालकाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपायोजना केल्या नसल्याचे दिसून आले. याबाबत त्यांनी पोलिसांत तक्रार केली असून संबंधित बांधकाम कामगारांच्या मृत्यूस जबाबदार धरून कंपनी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.








