वारकरी पंढरपूर पायी वारीला प्रयाण: मंत्री गोविंद यांच्या शुभेच्छा
माशेल : पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची तोडूनिया गाठ! या विठूरायाचा अभंगाच्या गजरात काल माशेल येथून दुसऱ्या पंढरपूरच्या पायी वारीला प्रारंभ क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते झाला. देवकीकृष्ण पायीवारी मंडळाच्या पायी वारील काल बुधवार 14 रोजी प्रारंभ झाला. एकूण 34 वारकऱ्यांनी सकाळी 8 वा. मंत्री गोविंद गावडे यांच्यासमवेत देवकीकृष्ण देवाला गाऱ्हाणे घातले. पटांगणावर मंत्री गावडे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून पंढरपूरच्या पायी वारीला प्रारंभ झाला. वारकरी प्रथम 500 मिटर पायी वारीत करीत माशेल बाजारवाडा येथील विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. भजन व अल्पोहार केल्यानंतर डिचोलीमार्गे विठ्ठलाच्या नामजप करीत प्रयाण केले. पुढील मुक्काम दोडामार्ग येथे असणार आहे. यावेळी बोलताना मंत्री गोविंद गावडे म्हणाले की संत तुकाराम महाराजांच्या या आनंदाचा अनुभव घ्यायचा असेल प्रत्येकाने पंढरपूरची वारी करावी. माशेल ते पंढरपूर सुमारे 350 कि मी. प्रवास करणे कठिण आहे. परंतू विठ्ठलाच्या नामस्मरणात सगळा थकवा दूर होत असतो. प्रत्येकाला ओढ पंढरपूरच्या विठ्ठलाची असते. तेरा दिवसाच्या पायी प्रवास करीत असताना आरोग्याची काळजी घ्या. एकमेकांची वेळोवेळी चौकशी करा. पंढरपूरच्या पायी वारीला खंड पडू देऊ नका असे अवाहन मंत्री गावडे यांनी केले. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य श्रमेश भोसले, सरपंच जयेश नाईक, उपसरपंच व इतर पंचसदस्य उपस्थित होते.









