या क्रीडा प्रकारात धावणे नियमाविरोधात
फुटबॉलविषयी विचार करताना आपण अनेकदा पळणाऱ्या खेळाडूंची कल्पना करतो. परंतु इंग्लंडमध्ये उदयास आलेल्या नव्या प्रकारच्या फुटबॉलने लोकांचा दृष्टीकोन बदलला आहे. 2011 मध्ये इंग्लंडमध्ये वॉकिंग फुटबॉल नावाने क्रीडाप्रकाराची सुरुवात झाली. फुटबॉलपेक्षा वेगळा असूनही हा क्रीडाप्रकार पूर्णपणे अनोखा नाही. वॉकिंग फुटबॉलमध्ये खेळाडूंना जिंकण्यासाठी धावावे लागत नाही, तर पूर्ण खेळादरम्यान चालत फुटबॉल खेळावा लागतो. गॅरी क्लार्क हे वयाच्या 7 व्या वर्षापासून फुटबॉल खेळत होते. वयाच्या 48 व्या वर्षी त्यांना गुडघ्याची शस्त्रक्रिया करवून घ्यावी लागली. डॉक्टरांकडून त्यांना भविष्यात कधीच फुटबॉल खेळता येणार नसल्याचे कळले. परंतु आता ते वॉकिंग फुटबॉल खेळत आहेत.
इंग्लंडमध्ये 600 हून अधिक क्लब
वॉकिंग फुटबॉलचे इंग्लंडमध्येच 600 हून अधिक क्लब आहेत. याच्या नियमानुसार कुठलाही खेळाडू सामन्यादरम्यान धावू शकत नाही. तसेच जॉगिंग करू शकत नाही. पूर्ण सामन्यादरम्यान त्याचा एक पाय जमिनीवर असणे आवश्यक आहे. याचे मैदान सामान्य मैदानापेक्षा छोटे असते. या खेळाद्वारे अनेक जणांनी कित्येक किलोंनी वजन घटविले आहे. एका अहवालानुसार 12 आठवडे वॉकिंग फुटबॉल खेळल्यास वृद्ध खेळाडूंमध्ये बॉडी मास आणि बॉडी फॅट कमी झाला आहे.
ऑगस्टमध्ये मोठी स्पर्धा
इंग्लंडमध्ये पुढील महिन्यात वॉकिंग फुटबॉलचा ‘वर्ल्ड नेशन्स कप’ आयोजित होणार आहे. डर्बी शहराच्या सेंट जॉर्ज पार्क स्टेडियममध्ये सर्व सामने खेळविले जातील. स्पर्धेत 40 संघ सहभागी होणार आहेत. 20 संघ 50 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील लोकांचे तर 20 संघ 60 वर्षांपेक्षा अधिक वयोगटच्या लोकांच्या गटात असतील. प्रत्येक देशाला दोन्ही श्रेणींमध्ये प्रत्येकी एक संघ उतरविता येईल. आतापर्यंत 40 देशांनी स्पर्धेसाठी नाव नोंदविले आहे.









