पुणे / प्रतिनिधी :
‘भारत जोडो’ यात्रेमुळे अनेक लोक एकत्र आली. काँग्रेस पक्षाला लोक जोडली जातील का? याचा विचार न करता राहुल गांधी आज चालत आहेत. यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षली जात आहेत. या यात्रेमुळे देशाची लोकशाही मजबूत होईल तसेच देशातील विभाजनकारी शक्तींना प्रेम, सत्य, अहिंसेच्या मार्गाने हरविले जाऊ शकते, हा या यात्रेचा संदेश आहे, असे मत कायदेतज्ज्ञ ॲड. असीम सरोदे यांनी येथे व्यक्त केले.
‘भारत जोडो’ यात्रेला 100 दिवस पूर्ण झाले. त्या निमित्ताने भारत जोडो यात्रा समिती, पुणे तर्फे पुण्यात शुक्रवारी प्रतिकात्मक पदयात्रा काढण्यात आली. त्यावेळी सरोदे बोलत होते. भारताला जोडणाऱ्या महात्मा गांधींचे राजकीय गुरू गोपाळ कृष्ण गोखले यांच्या पुतळय़ाला हार घालून पदयात्रेची सुरूवात करण्यात आली. या पदयात्रेचे प्रास्ताविक ॲड. अभय छाजेड यांनी केले.
अधिक वाचा : अमेरिकेने बनवला कृत्रिम सूर्य
यानंतर सामाजिक कार्यकर्ते विश्वभंर चौधरी यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. ते म्हणाले की, गेल्या आठ वर्षात समाजात, जातीजातीत, धर्माधर्मात द्वेष, तेढ निर्माण करून देशातील वातावरण दूषित करण्यात आले आहे. हे प्रयास आजही सुरू आहे. अशा वातावरणात देशाला धर्मनिरपेक्षतेच्या सूत्रात पुन्हा एकत्र बांधण्याचे काम महात्मा गांधींचे आचार विचार करू शकत होते. गेले शंभर दिवस कन्याकुमारीपासून सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ते ठळकपणे अधोरेखीत केले आहे. त्यामुळे या यात्रेमुळे म. गांधींनी दाखवलेल्या धर्मनिरपेक्षतेचा मार्ग काँग्रेसला पुन्हा एकदा गवसला आहे. तिरंगा झेंडय़ाखाली निघालेल्या या पदयात्रेचा समारोप पोलीस ग्राउंड येथे करण्यात आला.








