म्हादईप्रश्नी गोमंतकीयांनो एकत्रित लढा द्या : माशेल येथील ‘आमची म्हादय आमका जाय’ जाहीर सभा
वार्ताहर / माशेल
नद्याच्या काठावरच आपली संस्कृती निर्माण झाली आहे. अशाच नदीकाठावर अनेक पिढय़ाचे जीवन गेले आहे. त्यामुळे जगण्यासाठी पाणी हेच जीवन आहे. कर्नाटकाला केंद सरकारने पाणी वळविण्यास मान्यत दिल्यामुळे म्हादईबरोबर राज्यातील सर्व नद्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तेव्हा म्हदाईप्रश्नी राजकारण्यावर पुर्णतः विसंबून राहू नका. नद्याची काळजी घेण्यासाठी गोमंतकीयांना जागे व्हा! अशी घोषणा पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यानी माशेल येथील जाहीर सभेत केली.
माशेल येथील नोनूस व्हीलेज सभागृहात ‘आमची म्हादय आमका जाय’ या बॅनरखाली आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कांता गावडे, नोनू नाईक, रामकृष्ण जल्मी, राजेंद्र काकोडकर, पत्रकार राजू नायक उपस्थित होते. शिवाय उपस्थितांमध्ये विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार कार्लुस फेरेरा, प्रतिमा कुतिन्हो, डॉ. दत्ताराम देसाई, समील वळवईकर, दिलीप बोरकर, रमेश गावस, फादर इरीक परेरा, मधू गावकर व इतर उपस्थित होते.
लोकप्रतिनिधी अज्ञानी, म्हादईसाठी सर्वानी एकत्र यावे –केरकर
राजेंद्र केरकर पुढे बोलताना म्हणाले की लोकप्रतिनिधीचे म्हादई बाबत अज्ञान आहे. आईची लढाई जिंकण्यासाठी खासदार, आमदारांनी अभ्यास करायला पाहिजे. दिल्ली दरबारी नेमकी बाजू मांडली जात नाही, ही परिस्थिती बदलण्यासाठी आपली पाण्याची गरज, आपल्या नद्या आणि नैसर्गिक जलस्रोत याबाबत माहिती घ्यायला हवी. फक्त नदीला आई, जीवनदायिनी म्हणून काही उपयोग नाही. तीची काळजी घेतली पाहिजे. नद्याबाबत राजकारण उपयोगाचे नसून सर्वांनी एकत्र येऊन हा लढा लढला पाहिजे. म्हादई नेत्रावळी अभायारण्ये निश्चित करण्यात आली आहे. ही अभयारण्ये हवीत याबाबत सरकारने ठाम राहिले पाहिजे कर्नाटकाने फक्त कणकुंबी परिसरात कळसा नाला उध्वस्त केला नसून भांडुरा, हलतरा या ठिकाणी बंधारे बांधणार आहेत. गोव्याने लवादाकडे जाणेच मुळात चुकीचे होते कारण तिथे गेल्यानंतर पाणी वाटपाचा मुद्दा येणारच होता. प्रकरण लवादाकडे गेल्यामुळेच हा गोंधळ झालेला आहे.
गोव्याचे अस्तित्व म्हादईवर अवलंबून आहे. ते अस्तित्व टिकवण्यासाठी म्हादईचे रक्षण करण्यासाठी एकत्र आले पाहिजे असे आमदार कार्लुस फरेरा यांनी सांगितले. दिल्लीपुढे गोवा सरकार झुकत आहे. राज्याच्या भविष्याचा विचार करण्याची वेळ आली असून म्हादईच्या प्रश्नावर वेळकाडूपणा केला जात आहे. अधिवेशनातही आमच्या मागणीकडे ते प्रतिसाद देत नाही. रमेश गावस म्हणाले की राज्यात पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न असूनही खाणीमुळे अनेक तळी उध्वस्त झाली आहे. गोव्यातील राज्यकर्त्यांनी आपल्या कर्तव्याला जागले पाहिजे. म्हादई माता आहे, म्हणून चालणार नाही तिच्या रक्षणासाठी सर्वानी पुढे आले पाहिजे असे प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या. गोमंतकीयांनी म्हादईसाठी जात, धर्म, पक्षाचे भेदभाव विसरून एकत्र यावे. सर्वांनी म्हादईचे रक्षण करावे असे फादर इरीक पेरेरा म्हणाले. राजेद्र काकोडकर, दिलीप बोरकर, कांता गावडे यांची यावेळी भाषणे झाली. सुत्रसंचालन प्रकाश नायक यांनी केले. नोनू नाईक यांनी आभार मानले.









