कोल्हापूर/सुधाकर काशीद
ढासळणाऱया पन्हाळगडाची भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने तातडीने दखल घेतली आहे. तटबंदीला जेथे जेथे आधार देण्याची गरज आहे. त्याचा अंदाजित खर्च व त्याचे आराखडे तयार करण्यास सुरुवात झाली आहे. पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे संरक्षण सहाय्यक संजय चव्हाण यांनी मंगळवारी ‘तरुण भारत’ला ही माहिती दिली. भारतीय पुरातत्व विभागाकडे कोल्हापूर जिह्यातील पन्हाळा व खिद्रापूर या ऐतिहासिक स्थळांची जबाबदारी आहे. जिह्यातील अन्य गड, किल्ले राज्य पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहेत.
जिह्यातील पन्हाळगड हा देशातील सर्वात जुन्या किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे. सन ११०० ते १२०० या कालावधीत राजा भोज नरसिंह याच्या कारकीर्द पन्हाळगडाची बरीच बांधणी झाली. छत्रपती शिवरायांच्या शौर्यशाली इतिहासातील सर्वात कसोटीचा क्षण या किल्ल्यावर घडला आहे. सिद्धी जोहारच्या वेढय़ामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा सलग तीन महिन्यांहून अधिक काळ वेढय़ातील मुक्काम याच किल्ल्यावर होता. त्यामुळे पन्हाळगडाला शिवरायांच्या इतिहासात खूप महत्त्वाचे असे स्थान आहे.
साधारणतः १ हजार वर्षापासूनचे अस्तित्व असलेल्या या किल्ल्याने भोज शीलाहार, यादव, छत्रपती शिवाजी महाराज, आदिलशाही, महाराणी ताराराणी व त्यानंतर ब्रिटिश राजवटीचा इतिहास अनुभवला आहे. किल्ल्यावर तीन दरवाजा, अंबरखाना, अंधारबाव, सज्जाकोठी नायकिनीचा सज्जा, धर्मकोठी, रेडेमहाल, ताराराणीचा वाडा, महालक्ष्मी मंदिर, विठ्ठल मंदिर, साधोबा दर्गा अशा वास्तू आहेत. त्यातल्या प्रत्येक वास्तूचा इतिहास आणि त्याच्या बांधणीची शैली हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे.
काळाच्या ओघात ऊन, वारा, पाऊस याचे नैसर्गिक आघात या किल्ल्याने झेलले. लढाईच्या प्रसंगात तोफगोळे धडकले. ब्रिटिश राजवटीत तटबंदी, मुख्य दरवाजे अगदी ठरवून ब्रिटिशांकडून उद्ध्वस्त करण्यात आले. या परिस्थितीत आताही पन्हाळा इतर किल्ल्यांच्या तुलनेत जरूर चांगला आहे. पण तटबंदी, वास्तूची पडझड वारंवार काही प्रमाणात होतच आहे. केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे पन्हाळगडाचा ताबा आहे. या विभागाचे जरूर अनेक निर्बंध आहेत. पण पन्हाळा इतिहासाच्या शौर्य गाथेपेक्षा पन्हाळ्यावरील मौजमजा व पर्यटनासाठीच नव्या पिढीसमोर अधिक ठळकपणे येऊ लागला आहे.
पन्हाळ्यात कोणती ऐतिहासिक ठिकाणे कोठे आहेत, यापेक्षा मौजमजेची ठिकाणी कोठे दडली आहेत, याची माहिती ठळकपणे पुढे येत आहे. पन्हाळगडावर आपण मौजमजा करायला आलो आह। त्या पन्हाळगडावर सलग तीन महिन्यांहून अधिक काळ शिवाजी महाराज वेढय़ात अडकले होते, हे देखील बहुसंख्य पर्यटकांना आता माहिती नाही, अशी स्थिती आहे. ज्या पन्हाळ्यावर सलग तीन महिन्याहून अधिक काळ शिवाजी महाराज राहून व वेढय़ातून सुटून गेले आहेत, त्या पन्हाळगडाची माती कपाळाला लावण्याइतकी आजही पवित्र आहे, पण हेच पर्यटकांकडून येथे विसरले जात आहे.
स्थानिक पन्हाळकर, इतिहासप्रेमी नागरिक, काही जागरूक संस्था, संघटना त्यांच्या परीने पन्हाळ्याचा इतिहास जपण्यासाठी झटत आहेत. पण पर्यटनाच्या झगमगटात येथील इतिहास झाकोळला जाऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर चार दरवाजा म्हणजे पन्हाळ्याच्या मुख्य प्रवेशद्वाराचा उरलासुरला भागही ढासळत आहे. चार दरवाज्यातून पन्हाळ्यावर प्रवेश म्हणजे सुरक्षा यंत्रणेचे एक अभेद्य असे उदाहरण होते. ब्रिटिशांनी तोफा लावून हाच चार दरवाजा उद्ध्वस्त केला. आता जेथे प्रवासी करवसुली नाका आहे त्याच्या अलीकडे काही अंतरावर हा चार दरवाजा होता. तिथलाच रस्ता गेल्या पावसाळ्यात खचला आहे. पन्हाळ्यावरील अशा सर्व वस्तूचे जतन आणखी काही वर्षे ते बऱयापैकी तग धरू शकतील अशा पद्धतीने भक्कम करणे गरजेचे आहे. कारण किल्ला, त्याची तटबंदी, तिथल्या ऐतिहासिक वस्तू, तिथला इतिहास हा जिवंत राहिला तरच पन्हाळगड जिवंत राहणार आहे. आणि तोच काळाच्या ओघात ढासळत चालला तर पन्हाळगड केवळ नावालाच राहणार आहे.
स्थानिक नागरिक पन्हाळ्याच्या या अवस्थेबद्दल जागरूक आहेत. त्यांनीच आता पन्हाळा वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कारण काळाच्या ओघात जरूर खाणे, पिणे, मजा करणे, पावसात चिंब भिजणे म्हणजे पन्हाळा.. असा एका पिढीचा समज झाला आहे. पण नवी पिढी आणि पन्हाळ्याचा इतिहास याची सांगड घालूनच पन्हाळ्याची पन्हाळगड म्हणून वाटचाल सुरू ठेवावी लागणार आहे.









