भारतीय संघाने 11 पैकी आठ शिड्या चढल्या आहेत. सापशिडीचा खेळ हा थोडासा विचित्र असतो, एक नंबरपासून ते 98 नंबरपर्यंत जाताना तुम्ही रिलॅक्स असता. परंतु 99 च्या आकड्यावर तुम्हाला मोठा अजगर तुम्हाला गिळण्यासाठी टपलेला असतो. त्याच अजगराच्या सानिध्यात आलात तर तुम्ही झटकन खाली जाता. भारतीय संघासमोर आता दोन अजगर आहेत एक उपांत्य फेरीतला आणि एक अंतिम फेरीतला. राहुल द्रविडचे जेवढे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्याने एक स्थिर संघ खेळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात तो यशस्वी झाला.
गंमत बघा, ही स्पर्धा सुरू होण्याअगोदर 50 खेळाडूंवर प्रयोग करण्यात आले. त्यातच स्पर्धेसाठी कोणता चमू निवडायचा यावर थोडे वाद-विवाद झाले. भारतीय संघाची निवड थोडी उशिराच झाली. परंतु जी निवड झाली ती 100 नंबरीच होती, हे खेळाडूंनी दाखवून दिले. श्रेयस अय्यर, केएल राहुल यांच्यासारख्या जुन्या टॅलेंटवरच निवड समितीने विश्वास दाखवला. आणि तो विश्वास या जुन्या मंडळींनी सार्थ केला. रोहितने आफ्रिकाचा सामना संपल्यानंतर एक प्रकारे अप्रत्यक्ष वॉर्निंग सर्व खेळाडूंना दिली होती. आम्ही एक सामना एकाच वेळी घेत आहोत. अर्थात या वाक्यामध्ये बराच गर्भितार्थ दडला होता. मी क्रिकेट विश्लेषक म्हणून महिनाभर देव पाण्यात ठेवून बसलोय. अपेक्षा एवढीच आहे की गोऱ्यांनी (इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आफ्रिका) भारतीयांना आदराने हाक मारली पाहिजे. मागील तेरा वर्षात क्षमता असूनसुद्धा भारतीय संघ पिछाडीवर पडला. सर्वात कमी वेळात भारतीय संघाने स्वत:त केलेला बदल हे न उलगडणारे कोडं आहे. भारतीय संघाकडे क्षमता नाही आहे का? तर असं मुळीच नाही. परंतु ऐन मोक्याच्या वेळी भारतीय संघ कच खायचा ते दृश्य या स्पर्धेत औषधालाही बघायला मिळालं नाही.
त्यातच ही स्पर्धा भारतीय खेळपट्ट्यांवर. आता त्याचाही छान फायदा भारतीय संघाने उठवला. मला जेव्हापासून क्रिकेट समजू लागलं तेव्हापासून मी कपिल देव, करसन घावरी, चेतन शर्मा, श्रीनाथ, व्यंकटेश प्रसाद, पारस म्हांबरे यासारखे वेगवान गोलंदाज बघितले. या सर्व मंडळींचा भारतीय क्रिकेटच्या यशात फार मोठा वाटा आहे. परंतु सद्यस्थितीत जे वेगवान त्रिकूट आहे आणि त्यांनी केलेली कामगिरी भविष्यात भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या ओठांवर वर्षानुवर्षे असणार यात तीळमात्र शंका नाही. प्रत्येक गोलंदाज पाच गडी बाद करण्याच्या शर्यतीत आहे. मला आठवतंय की 2011 मध्ये भारतीय संघाने जो विश्वचषक जिंकला होता त्या अगोदर प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी भारतीय खेळाडूंना तंबीच दिली होती की, तुम्हाला ज्या पार्ट्या करायच्या आहेत त्या दोन एप्रिल 2011 नंतरच. त्यानंतर काय घडलं हे सर्वश्रुत आहे. नेमकी तीच परिस्थिती आता येऊन ठेपली आहे. मागील दोन-तीन वर्षाचा विचार केला तर मोठ्या स्पर्धेत भारतीय संघ पॅक टीम घेऊन उतरला नव्हता. परंतु या स्पर्धेत दृश्य मात्र वेगळे बघायला मिळाले. आणि अर्थात त्याचे परिणाम स्पर्धेच्या मध्यंतरापर्यंत तरी चांगलेच मिळाले आहेत.
1983 मध्ये भारताने कपिल देवच्या नेतृत्वात विश्वचषक जिंकला आणि खऱ्या अर्थाने भारतीयांना क्रिकेटचं वेड लागलं. काळ बदलला जमाना बदलला. 2011 मध्ये धोनीने क्रिकेटभोवती एक वेगळ वलय निर्माण केलं. आणि आत्ता वेळ आली आहे ती 2023 मध्ये रोहितच्या नेतृत्वात क्रिकेटच्या शिखरावर पोहोचण्याची. आता खरी कसोटी आहे ती भारतीय खेळाडूंच्या मानसिकतेची, कारण स्पर्धा ही आता नॉकआऊट स्टेजवर येऊन ठेपली आहे. कारण सरते शेवटी असंच म्हटलं जातं, जो जीता वही सिकंदर!









