शेतकरी, रहिवाशांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : तालुक्यातील कडोली येथील एका शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वी संस्थेकडून कर्जफेडीचा तगादा लावल्याने आत्महत्या केली. सातेरी रुटकुटे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेला सर्वस्वी सदर संस्थाच जबाबदार आहे. या घटनेमुळे मृताच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण कुटुंबीय रस्त्यावर आले आहे. यासाठी त्यांचे सर्व कर्ज माफ करून त्यांना भरपाई देण्याची मागणी राज्य रयत संघटना व हसिरू सेनेच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
रुटकुटे यांनी एका खासगी सोसायटीकडून घरबांधकामासाठी 12 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. यापैकी 4 लाख रुपयांची त्यांनी परतफेड केली होती. मात्र शेतातील भाजीपाल्याचे उत्पादन कमी झाल्याने वेळेवर कर्जाचे हप्ते फेडता आले नाहीत. कर्जाच्या हप्त्याची 31 ऑक्टोबर शेवटी तारीख असूनही 25 ऑक्टोबरला बँकेच्या कर्मचाऱ्यांनी घरी येऊन संपूर्ण कर्जफेडीसाठी तगादा लावला. याच्या मानसिकतेतूनच रुटकुटे यांनी आत्महत्या केली.
जर संस्थेने सौहार्दतेने रुटकुटे यांना समजावून सांगून कर्जफेड करून घेतली असती व कायद्याच्या चौकटीत राहून कर्जाची रक्कम वसूल केली असती तर शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला नसता. या घटनेतील सत्यता पडताळून पहावी. त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी भरपाई मिळवून देऊन त्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी आप्पासाहेब देसाई, सुभाष धायगोंडे, मारुती कडेमनी, राजू कागणीकर, चंद्राम राजाई, फकिरा सदावर, नामदेव दुडूम, रामनगौड पाटील यांच्यासह शेतकरी, रहिवासी उपस्थित होते.









