मात्र सरकारची फेब्रुवारीची अट : वाहनचालकांची कोंडी
बेळगाव : जुन्या वाहनांसाठी एचएसआरपी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) सक्तीची करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांकडून नव्या नंबरप्लेट तयार करण्यासाठी धावपळ सुरू आहे. एचएसआरपी नंबरप्लेट मिळविण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असून बेळगावमध्ये काही दुचाकी कंपन्यांचे तब्बल एप्रिलपर्यंतचे बुकिंग फुल्ल असल्याने नंबरप्लेट मिळवायची कशी? असा प्रश्न वाहनचालकांसमोर आहे. एप्रिल 2019 पूर्वी रजिस्ट्रेशन झालेल्या वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट सक्तीची करण्यात आली आहे. नव्या नंबरप्लेटमध्ये आधारकार्डप्रमाणे नंबर दिला असून याद्वारे वाहनाची संपूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. तसेच वाहनांची चोरी करून त्यांचा गैरवापर करणेही थांबणार आहे. नवी नंबरप्लेट वाहनामध्ये रिबिटद्वारे कायमस्वरुपी बसविली जाणार असल्याने ती सहजासहजी काढता येणार नाही. यासाठी नव्या नंबरप्लेटची सक्ती केली जात आहे. 17 फेब्रुवारी-2024 पर्यंत राज्य सरकारने मुदत दिली असून त्यापूर्वी नागरिकांना नव्या नंबरप्लेट बसविणे गरजेचे आहे.
बेळगाव विभागामध्ये लाखो जुनी वाहने असून त्यांच्या नंबरप्लेट बदलल्या जात आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. संबंधित वाहनचालकाने वेबसाईटवर जाऊन आपल्या वाहनाची संपूर्ण माहिती, ओटीपी क्रमांक व ऑनलाईन चार्जेस भरल्यानंतर संबंधित वाहनाच्या डिलरकडे केव्हा नंबरप्लेट उपलब्ध होईल, याची तारीख दाखविली जाते. त्या तारखेला डिलरकडे जाऊन नंबरप्लेट बदलली जाऊ शकते. डिलरकडे स्लॉट उपलब्ध नसेल तर एजंटद्वारेही घरपोच सेवा मिळणार आहे. यासाठी वाहनचालकाला अधिक रक्कम मोजावी लागेल. नागरिकांकडून ऑनलाईन नोंदणी केली जात आहे. परंतु, काही दुचाकी वाहनांचे केवळ एकच डिलर बेळगावमध्ये असल्याने एप्रिलपर्यंत बुकिंग फुल्ल असल्याचे दर्शविले जात आहे. त्यामुळे नागरिकांना चिकोडी, निपाणी अथवा हुबळी येथील डिलरकडे बुकिंग करावे लागत आहे. त्यामुळे बेळगावमध्ये डिलरच्या संख्येत वाढ करून नंबरप्लेट लवकर मिळेल, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
अशी मिळवा एचएसआरपी नंबरप्लेट
एचएसआरपी नंबरप्लेटसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करणे गरजेचे आहे. परिवहन विभागाच्या www.traहेज्दू.क्arहूक्a.gदन्.ग्ह किंवा www.sग्aस्.ग्ह या वेबसाईटवर जाऊन बुक एचएसआरपी यावर क्लिक करावे. त्यानंतर आपल्या वाहनाची संपूर्ण माहिती भरून ओटीपी व त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करावे. अशा पद्धतीने नागरिकांना एचएसआरपी नंबरप्लेट उपलब्ध होऊ शकते.









