शिक्षक भरती प्रक्रिया लटकलेली, पात्र उमेदवार आले रडकुंडीला
बेळगाव : वर्ष उलटले तरी अद्याप शिक्षक भरतीचे घोंगडे भिजतच पडले आहे. या ना त्या कारणाने शिक्षक भरती पुढे ढकलली जात असून, यामुळे पात्र उमेदवारांचे हाल होत आहेत. वर्षभरापासून अनेकजण कामधंदे सोडून यामागे लागले असून त्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पात्र उमेदवारांना कधी एकदा अंतिम यादी लागते, याची प्रतीक्षा आहे. सरकार मात्र विविध कारणे देऊन शिक्षक भरती टाळण्याचा प्रयत्न करीत आहे. मागीलवर्षी राज्यात पंधरा हजार शिक्षकांची भरती केली जाणार, असे शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी जाहीर केले. त्यानुसार भरतीसाठी अर्जही मागविले. शिक्षक भरतीसाठी राज्यात सीईटी घेतली. यातील गुणवत्ता प्राप्त उमेदवारांची यादी तयार करून त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. राज्यात एकूण 13 हजार उमेदवार शिक्षक भरतीसाठी पात्र ठरले. कर्नाटकात कन्नड, मराठी, उर्दू व इंग्रजी माध्यम शाळांमध्ये अनेक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून 13 हजार शिक्षकांना नियुक्त्या देण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाचा होता. परंतु, त्यापूर्वी काही महिला उमेदवारांनी अन्याय झाल्याबद्दल न्यायालयात दाद मागितली. नवविवाहीत उमेदवारांनी आपल्या वडिलांचेच जात व उत्पन्न प्रमाणपत्र सादर केल्याने त्यांना डावलले होते. परंतु, न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर पुन्हा एकदा पात्र उमेदवारांची नवी यादी जाहीर करण्यात आली.
निवडणुकीमुळे भरतीला पुन्हा ब्रेक
जानेवारी महिन्यात नवीन यादी तयार केली खरी. परंतु, त्यापूर्वी कल्याण कर्नाटकातील काही उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. शिक्षक भरती प्रक्रियेत कल्याण कर्नाटकाला अत्यंत कमी जागा दिल्याचे सांगत त्यावर तोडगा काढण्याची मागणी केली होती. त्यानंतर लगेचच कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू केल्याने शिक्षक भरतीला पुन्हा ब्रेक लागला. यामुळे पात्र उमेदवार भरती प्रक्रियेची वाट पहात आहेत.
लवकरच अंतिम यादी जाहीर करा
शिक्षक भरतीमध्ये पात्र उमेदवार हे काही खासगी शाळांमध्ये शिक्षक म्हणून काम करत आहेत. तर उर्वरित अनेक संस्थांमध्ये विविध पदांवर नोकरी करत आहेत. शिक्षक भरतीसाठी वारंवार शिक्षण विभागात उपस्थित रहावे लागत असल्याने अनेकांनी नोकरीचा राजीनामा दिला. त्यामुळे या उमेदवारांसमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. वर्ष उलटले तरी शिक्षक भरतीची अंतिम यादी जाहीर केली जात नसल्याने उमेदवारांमधून संताप व्यक्त होत आहे. किमान पुढील महिनाभरात तरी अंतिम यादी जाहीर करून नियुक्त्या कराव्यात, अशी मागणी होत आहे.









