मध्यवर्ती बसस्थानकातील चित्र, बसथांब्यांचा अभाव
बेळगाव : मध्यवर्ती बसस्थानकात आसन आणि फलाटची कमतरता असल्याने प्रवाशांना भरपावसात थांबावे लागत आहे. स्मार्ट बसस्थानकात प्रवाशांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. शक्ती योजनेमुळे प्रवासी संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. मात्र, या तुलनेत प्रवाशांना सुविधा मिळत नसल्याने अनेक असुविधांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत परिवहन आता गांभीर्याने घेणार का? हे पहावे लागणार आहे. दररोज हजारो प्रवाशांनी मध्यवर्ती बसस्थानक गजबजू लागले आहे. विविध ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढली आहे.
मात्र, बसस्थानकात प्रवाशांना सुविधा मिळत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. विशेषत:पाऊस आला की आसरा घेण्यासाठी बसथांबे कमी पडत असल्याने नाईलाजास्तव रस्त्यावर थांबावे लागत आहे. त्यामुळे बसनाही अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. बसस्थानकात प्रवाशांबरोबर विद्यार्थीवर्गाची संख्याही वाढत आहे. मात्र, बसथांब्यांअभावी प्रवाशांना ऊन-पावसाचा सामना करत ताटकळत थांबावे लागत आहे. यामध्ये वयोवृद्ध आणि महिला-बालकांची हेळसांड होताना दिसत आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचीही सुविधा बसस्थानकात नाही. स्मार्ट बसस्थानकात सुविधा पुरवाव्यात, अशी मागणीही प्रवाशांनी केली आहे.









