वेळापत्रकात होणारा बदल ठरतोय अडसर
बेळगाव : बेंगळूर-धारवाड वंदे भारत एक्स्प्रेसचा बेळगावपर्यंत विस्तार करण्यासाठी थेट रेल्वेमंत्र्यांना अनेकवेळा साकडे घालण्यात आले. परंतु, त्याचा अद्याप काही परिणाम झालेला दिसत नाही. एकीकडे नागरिकांमधून प्रचंड मागणी होत असताना दुसरीकडे रेल्वे बोर्डकडून वेळेच्या नियोजनाकडे बोट दाखवले जात असल्याने लोकप्रतिनिधीही चिंतेत आहेत. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी तारेवरची कसरत सुरू आहे. टू-टायर व थ्री-टायर शहरांना महानगरांशी जोडण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्या. बेंगळूर-हुबळी या दरम्यान सुरुवातीला वंदे भारत सुरू झाली. ही एक्स्प्रेस बेळगावपर्यंत धावावी, यासाठी डिसेंबर 2023 मध्ये चाचणीही घेण्यात आली. परंतु, त्यानंतर मात्र विविध तांत्रिक कारणे देत रेल्वे बोर्डने वंदे भारत सुरू करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. खासदार जगदीश शेट्टर, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, कर्नाटक राज्याचे दिल्ली येथील विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींनी वंदे भारत एक्स्प्रेससाठी अनेक वेळा निवेदने दिली. परंतु, अद्याप त्याची दखल घेण्यात आलेली नाही.
एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार सध्या वंदे भारत एक्स्प्रेस बेंगळूरहून सकाळी 5.45 वाजता निघते. दुपारी 12.10 वाजता धारवाडला पोहोचते. पुन्हा परतीच्या प्रवासात दुपारी 1.15 वाजता धारवाड येथून निघून रात्री 8.45 वाजता बेंगळूरला पोहोचते. वंदे भारतचा बेळगावपर्यंत विस्तार केल्यास प्रवासासाठी पाच तासांचा कालावधी वाढू शकतो. येण्या-जाण्याचे चार तास तर एक तास स्वच्छतेसाठी लागणार असल्याने रात्री 12 वाजता बेंगळूरला रेल्वे पोहोचल्यास प्रवाशांचे हाल होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. बेंगळूरची मागणी होत असताना मध्यरेल्वेच्या पुणे विभागाने पुणे-हुबळी मार्गावर वंदे भारत सुरू करून वेगळे वेळापत्रक दाखवून दिले. सध्या या रेल्वेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे नैर्त्रुत्य रेल्वेने वेळेमध्ये काहीसा बदल केल्यास वंदे भारत सुरू होण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून वंदे भारत सुरू होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, ही अपेक्षा भंग झाल्याचे दिसून येत आहे.
वेळापत्रक रेल्वे बोर्डला सुचविले : जगदीश शेट्टर
बेंगळूर-धारवाड वंदे भारत एक्स्प्रेसचा बेळगावपर्यंतचा विस्तार करण्यासाठी तयारी सुरू आहे. सध्याच्या वेळापत्रकात काहीसा बदल केल्यास वेळेचे नियोजन करता येईल. सकाळी 5 वाजता बेळगावमधून वंदे भारत निघाल्यास दुपारी 12.30 वाजता ती बेंगळूरला पोहोचेल. दुपारी 1.30 वाजता बेंगळूरहून रेल्वे निघाल्यास रात्री 9 वाजता बेळगावला पोहोचेल, असे वेळापत्रक रेल्वे बोर्डला सुचविण्यात आले आहे. यावर त्यांच्याकडून चाचपणी सुरू आहे.









