गणेश आगमन अवघ्या 17 दिवसांवर : येळळूर येथील मूर्ती शाळांमध्ये चालली लगबग
वार्ताहर /येळ्ळूर
वर्षातून एकदा येणाऱ्या बाप्पांच्या आगमनासाठी आता लगबग वाढू लागली आहे. येळ्ळूर परिसरातही अनेक मूर्तिकारांची धांदल उडाली आहे. अवघ्या 17 दिवसांवर येवून ठेपलेला गणेश उत्सव साजरा करण्यासाठी सर्वांचीच आतुरता वाढली आहे. येळ्ळूर परिसरात मूर्तिकारांची लगबग वाढली असून लहान मूर्तींवर रंगकामही सुरू झाले आहे. येळ्ळूर परिसरात समाज प्रबोधनात्मक देखावे व आकर्षण, सजावट यामुळे गाव नेहमीच चर्चेत असते. मूर्तिकार ही परंपरा अखंड राखण्यासाठी अहोरात्र झटत असतात. अवघ्या 17 दिवसांवर गणरायांचे आगमन आल्यामुळे मूर्तिकारही जोमाने कामाला लागले आहेत. मध्यंतरी पडलेल्या सततच्या पावसामुळे मूर्तीकामात थोडा व्यत्यय आला होता. त्याची भरपाई करण्यासाठी आता ते रात्रीचा दिवस करीत आहेत. गाव व परिसरामध्ये जवळपास पंधराशे ते दोन हजार गणेशमूर्तीची स्थापना होते.
शिवाय गावातील प्रत्येक गल्लीतील मंडळाच्या सार्वजनिक गणेशाची स्थापना होते. सुबक व आकर्षक मूर्ती बनवण्यासाठी गावातील मूर्तिकार फार वर्षांपासून प्रसिद्ध आहेत. हीच पंरपरा आज यलाप्पा मेलगे, विक्रांत कुंडेकर, राकेश पाटील, अभिजीत लोहार या मूर्तिकारांनी पुढे चालविली आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांनाही आता गणेश आगमनाचे वेध लागले असून मूर्तीच्या सजावट व देखाव्याची जमवाजमव सुरू आहे. बालचमूही घरगुती सजावटीसाठी पालकांच्या मागेपुढे करत आहेत. येळ्ळूर येथील मूर्तिकारांनी बनवलेल्या मूर्तींना इचलकरंजी, दांडेली, कोप्पळ या भागातून मोठी मागणी असून, बेळगाव ग्रामीण परिसरातूनही मूर्तींना फार पसंती आहे. एक, दोन ते अडीच फुटापर्यंतच्या घरगुती गणेशमूर्ती तर सहा ते चौदा फुटापर्यंतच्या मंडळाच्या मूर्तींना मोठी मागणी असल्याचे यावेळी मूर्तिकार कुंडेकर व मेलगे यांनी सांगितले.
रेडीमेड स्टॉलचा फटका
वाढती महागाई, कुशल कारागिरांची कमतरता गावागावातून वाढलेले मूर्तींचे रेडीमेड स्टॉल यांचा मोठा फटका बसत असून मागणी आणि आर्थिक ताळमेळ घालताना कसरत करावी लागत आहे, असे सर्वच मूर्तिकारांनी सांगितले.









