दापोली :
तालुक्यातील करजगाव, तामसतीर्थ बुरोंडी नदीवर सुमारे पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला कॉजवे दोन वर्षांपूर्वी वाहून गेला. यामुळे करजगाव तामसतीर्थ आणि बुरोंडी ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. या कॉजवेच्या दुरुस्तीची ग्रामस्थांना प्रतीक्षा असली तरी सदर कॉजवेची शासकीय दप्तरी नोंद नसल्याने याबाबत अडचणी निर्माण झाल्या आहेत.
करजगाव, तामसतीर्थ आणि बुरोंडी या दोन गावांच्या मधून वाहणाऱ्या नदीमुळे हा कॉजवे दोन्ही गावांच्या दळण-वळणासाठी महत्वपूर्ण ठरत होता. मात्र काही वर्षांपूर्वी तो वाहून गेल्याने येथील ग्रामस्थांन ये-जा करण्यासाठी मोठा वळसा मारावा लागत आहे. मुळातच या नदीवर पूल बांधण्याची ग्रामस्थांची मागणी असताना कॉजवे बांधण्यात आला. तोही दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात वाहून गेल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.
मुळात या कॉजवेची सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग दापोली येथे नोंद नसल्याचे समोर आहे. त्यामुळे या बांधलेल्या कॉजवेचे परीक्षण केले कुणी? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. यामुळे कॉजवेच्या दुरुस्ती प्रक्रियेतही अडथळा येत आहे.
बुरोंडी-राणेवाडीजवळ किन्हळ, देवके करजगाव या नद्यांच्या संगम होतो. येथे पाण्याचा प्रवाह मोठा असतो. पाण्याच्या प्रवाहातून वाहून आलेला कचरा कॉजवेच्या नाल्यात अडकून बुरोंडी मुख्य मार्गावर पाणी येते. यामुळे पावसाळ्यात या मार्गावर वाहतूक थांबते. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे येथील धार्मिक स्थळांना थोका निर्माण होईल अशी स्थिती निर्माण होते. त्यामुळे या कॉजवेच्या ठिकाणी पूल व्हावा, अशी मागणी पुन्हा जोर धरत आहे. मात्र या कॉजवेची नोंदच नसल्याने दोन्ही बांधकाम विभागात एक प्रकारे पेच निर्माण झाला आहे. याबाबत बुरोंडी ग्रामपंचायतीकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.








