अर्ज प्रलंबित, लाभार्थी चिंतेत : 85 हजारांहून अधिक लाभार्थी अन्नभाग्यपासून वंचित
प्रतिनिधी / बेळगाव
मागील कित्येक दिवसांपासून नवीन रेशनकार्डची प्रक्रिया थांबल्याने लाभार्थी अडचणीत आले आहेत. शिवाय गॅरंटी योजनांपासून वंचित राहण्याची चिंताही व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना नवीन रेशनकार्डच्या कामाची प्रतीक्षा लागली आहे.
सरकारने पाच गॅरंटी योजना लागू केल्या आहेत. या योजनांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र नोंदणीसाठी रेशनकार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची शासकीय कागदपत्रे मिळविण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. मात्र मागील कित्येक दिवसांपासून नवीन रेशनकार्डचे कामकाज बंद राहिल्याने योजनेपासून वंचित राहण्याची चिंता व्यक्त होत आहे.
नवीन रेशनकार्ड मिळावीत यासाठी 85 हजारांहून अधिक लाभार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. मात्र अर्ज निकालात काढण्यात आले नसल्याने अन्नभाग्यपासून वंचित रहावे लागणार आहे. त्यामळे पात्र असूनदेखील काहींना लाभ मिळणार नसल्याने नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. सध्या ऑनलाईन नोंदणीदेखील बंद झाली आहे. त्यामुळे अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
जानेवारी 2021 पासून अर्ज प्रलंबित आहेत. त्यानंतर अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना अद्याप रेशनकार्ड वितरित झाली नाहीत. त्यामुळे रेशनकार्ड न मिळालेल्या लाभार्थ्यांची संख्या मोठी आहे. काहींनी खोटी माहिती पुरवून रेशनकार्डे मिळविली आहेत. त्यामुळे सरकारच्या अन्नभाग्य योजनेवर मोठा भार पडणार आहे.
अन्नभाग्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांना माणसी पाच किलो तांदूळ आणि प्रतिकिलो 34 रुपयेप्रमाणे 170 रु. रक्कम दिली जात आहे. अन्नभाग्यचा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जात आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना जुलैपासून धान्याबरोबरच रोख रक्कमही मिळू लागली आहे. त्यामुळे नवीन रेशनकार्डची मागणी वाढली आहे. विशेषत: बीपीएल कार्डसाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या मोठी आहे.









