पर्यावरणपूरक प्रवास : बेंगळूर-म्हैसूर-दावणगेरेत सेवा : बेळगावात कधी?
प्रतिनिधी/ बेळगाव
प्रदूषण टाळून खर्चाची बचत व्हावी, यासाठी परिवहन मंडळाच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बस दाखल होऊ लागल्या आहेत. राज्यातील बेंगळूर, म्हैसूर, दावणगेरे, दक्षिण कर्नाटकात इलेक्ट्रिक बस धावू लागल्या आहेत. त्यामुळे बेळगाव विभागाला इलेक्ट्रिक बसची प्रतीक्षा लागली आहे.
राज्यातील बेळगाव, चिक्कमंगळूर, शिमोगा, हुबळी, मंगळूर आदी शहरांमध्ये ही बससेवा धावणार आहे. त्यामुळे लवकरच बेळगावमध्येदेखील इलेक्ट्रिक बस दिसणार आहे. उत्तर कर्नाटकात शहरांचा झपाट्याने विकास होऊ लागला आहे. शिवाय लोकसंख्या आणि वाहनांची संख्याही वाढू लागली आहे. परिणामी वायू प्रदूषण वाढले आहे. अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक बस सोयीस्कर ठरणार आहे. या बसमुळे पर्यावरण प्रदूषण रोखण्याबरोबर डिझेलचीही बचत होणार आहे. त्यामुळे उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून इलेक्ट्रिक बस लाभदायी ठरणार आहे.
बीएमटीसीच्या व्याप्तीमध्ये 450 हून अधिक इलेक्ट्रिक बसेस विविध मार्गांवर धावू लागल्या आहेत. उत्तर कर्नाटकातील बेळगाव, धारवाड, गदग, हावेरी, बागलकोट आदी जिल्ह्यांमध्ये इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. वर्षभरापूर्वी इलेक्ट्रिक बससाठी निविदा मागविण्यात आली होती. दरम्यान, एका खासगी संस्थेने अधिक रकमेची मागणी केली होती. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया रेंगाळली होती. मात्र, पुन्हा निविदा मागवून इलेक्ट्रिक बस सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
कंत्राटी पद्धतीने इलेक्ट्रिक बस चालविणाऱ्या कंपन्या प्रतिकिलोमीटर प्रवासासाठी सरासरी 56 रुपयांचे शुल्क आकारणी करतात. बससाठी प्रत्येक किलोमीटरला 35 ते 36 रुपये खर्च येतो. महामंडळाला स्वत:च्या उत्पन्नातून हा निधी द्यावा लागतो. शासनाकडून कोणतेही अनुदान मिळत नाही. त्यामुळे उत्तर कर्नाटकात इलेक्ट्रिक बसचा उपक्रम रेंगाळला आहे. शासनाने इलेक्ट्रिक बससाठी अनुदान उपलब्ध करून द्यावे आणि इलेक्ट्रिक बसेस सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.
चार्जिंग स्टेशनचा अभाव आणि इतर कारणांमुळे इलेक्ट्रिक बसेस थांबल्या होत्या. मात्र, आता चार्जिंग स्टेशनसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात उत्तर कर्नाटकातही इलेक्ट्रिक बस धावताना दिसणार आहेत. या बसमध्ये इमर्जन्सी अलार्म, प्रथमोपचार पेटी, मोबाईल चार्जिंग, आपत्कालीन खिडकी यासह इतर सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. दोन-तीन तास चार्ज केल्यानंतर ही बस 200 ते 250 किलोमीटर धावत आहे. त्यामुळे उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून परिवहनला या बसेस लाभदायी ठरणार आहेत.
गणेश राठोड (विभागीय नियंत्रक, परिवहन)
बेंगळूरसह इतर शहरात इलेक्ट्रिक बस धावू लागल्या आहेत. काही ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर बसेस सोडण्यात आल्या आहेत. बेळगाव शहरालाही इलेक्ट्रिक बस मिळाव्यात, यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. लवकरच बेळगावात परिवहनची इलेक्ट्रिक बस धावताना पाहायला मिळणार आहे.









