अधिकृत आदेश नाहीच : बेंगळूर मनपातील सफाई कामगार सेवेत कायम
बेळगाव : कामगार दिनाचे औचित्य साधून बृहतबेंगळूर महानगरपालिकेत काम करणाऱ्या 12 हजार 692 सफाई कामगारांना सेवेत कायम करण्याचे नियुक्तीपत्र मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी वितरित केले आहे. मात्र, बेळगाव महापालिकेतील 134 सफाई कामगार अद्यापही सेवेत कायम होण्यापासून वंचित आहेत. बेळगाव महापालिकेतील कर्मचाऱ्यांनादेखील कायम करून घेतले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अद्यापही सरकारकडून अधिकृत आदेश आलेला नाही. राज्यातील विविध महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्यांना सेवेत कायम करण्याचे आश्वासन काँग्रेसच्यावतीने विधानसभा निवडणुकीपूर्वी देण्यात आले होते. पक्ष सत्तेत येताच त्याची अंमलबजावणी केली जात आहे. अलीकडेच कलामंदिरचे लोकार्पण कार्यक्रमाला मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी सर्व सफाई कामगारांना सेवेत कायम करण्याचे आश्वासन दिले होते.
त्यानंतर कामगार दिनानिमित्त बेंगळूर येथे आयोजित बृहतबेंगळूर महापालिकेतील 12 हजार 692 सफाई कामगारांना सेवेत कायम केल्याचे नियुक्तीपत्र दिले आहे. त्याचबरोबर प्रतिमहिना 39 हजार रुपये वेतन, निवृत्तीवेळी 10 लाख रुपये आणि 6 हजार रुपये पेन्शन देण्यात येणार असल्याचेही सरकारने जाहीर केले आहे. बेळगाव महानगरपालिकेतील 134 सफाई कामगारांना सेवेत कायम करून घेतले जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, अद्यापही सरकारकडून अधिकृत आदेश महापालिकेला मिळालेला नाही. यापूर्वी बेळगाव महानगरपालिकेकडून पहिल्या टप्प्यात 94 आणि दुसऱ्या वेळी 124 कामगारांना सेवेत कायम करून घेण्यात आले होते. त्यानंतर आता 134 सफाई कामगार प्रतीक्षेत आहेत. बेंगळूर महानगरपालिकेप्रमाणेच राज्यातील इतर महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्यांना सेवेत कायम करून घ्यावे, अशी मागणी प्रियांक खर्गे यांनी देखील केली आहे.









