आचरा /प्रतिनिधी-
वायंगणी बौद्ध वाडी येथील नाल्यावरील पूल धोकादायक बनला असून कमी उंचीमुळे कायम पाण्याखाली जात आहे. याबाबत प्रशासन, लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
वायंगणी बौद्ध वाडी आचरा हिर्लेवाडी जोडणारा दुवा म्हणून वायंगणी बौद्ध वाडी येथील नाल्या्रचा पूल महत्त्वाचा ठरत आहे. मात्र हा पूल जिर्ण झाला असून पुलाच्या कमी उंची मुळे कायम पाण्याखाली जात असतो. पुलाला मोठे खड्डे ही पडल्याने वाहतूकीस धोकादायक बनला आहे. यामुळे याजागी नवीन पूल उभारण्याची येथील ग्रामस्थांकडून मागणी केली जात आहे. याबाबत प्रशासन, लोकप्रतिनिधी चे लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे. याचा फटका याभागातील ग्रामस्थांना पावसाळ्यात कायम बसत आहे.कमी उंचीमुळे थोड्याश्या पावसातही पूल पाण्याखाली जात असल्याने येथील ग्रामस्थांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे शासन, लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देत पुलाची उंची वाढविण्याची मागणी होत आहे.









