राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण : अल्लू अर्जुन, आलिया भट, क्रीति सेनॉनचा गौरव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात दिग्गज अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वहिदा रहमान यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सभागृहात उपस्थित सर्व मान्यवरांना उभे राहून अभिनेत्रीला मानवंदना दिली तसेच टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले.
फाळके पुरस्कार मिळाल्याने मी स्वत:ला अत्यंत सन्मानित समजत आहे. परंतु आज ज्या टप्प्यावर मी पोहोचली आहे, ते केवळ माझ्या चित्रपटसृष्टीमुळेच शक्य झाले आहे. सुदैवाने मला अत्यंत चांगले दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ, लेखक, संवाद लेखक, संगीत दिग्दर्शकांसोबत काम करता आले, त्यांच्याकडून मला आदर मिळाल्याचे वहिदा रहमान यांनी म्हटले आहे.
हा पुरस्कार मी माझ्या चित्रपटसृष्टीतील सर्व विभागांना समर्पित करू इच्छिते, कारण त्यांनी पहिल्या दिवसापासून माझ्यावर प्रचंड प्रेम केले, मला पाठिंबा दिला. कुणीच एकट्याच्या बळावर चित्रपट तयार करू शकत नाही, चित्रपटाकरात आम्हाला सर्वांची गरज भासते असे उद्गार त्यांनी काढले आहेत.
वहिदा रहमान यांनी स्वत:चा कला आणि व्यक्तिमत्त्वाने चित्रपटजगताच्या शिखरावर स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. वहिदा रहमान यांनी चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी स्वत:चे नाव बदलण्यास नकार दिला होता. वहिदा रहमान यांनी महिला सबलीकरणासाठी महिलांनाच पुढे यावे लागेल हे स्वत:च्या उदाहरणासह मांडल्याचे गौरवोद्गार राष्ट्रपती मुर्मू यांनी काढले आहेत.
अल्लू अर्जुनला पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार
तेलगू सुपरस्टार अल्लू अर्जुनला पुष्पा या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तर आलिया भट्टला ‘गंगूबाई’ आणि क्रीती सेनॉनला ‘मिमी’ या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याचबरोबर ‘द नांबी इफेक्ट’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाला नर्गिस दत्त पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ‘सरदार उधम’ या दिग्दर्शक सुजीत सरकार यांच्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. पल्लवी जोशी यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. श्रेया घोषाल ही सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्काराने सन्मानित झाली आहे.









