ब्रिटनकडून निर्णय : खासगी सैन्याचे सदस्य हिंसक
वृत्तसंस्था/ लंडन
वॅगनर या रशियाच्या भाडोत्री सैन्याचे प्रमुख प्रिगोजिन यांच्या मृत्यूनंतर ब्रिटनने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वॅगनर या भाडोत्री सैन्याला दहशतवादी संघटना घोषित करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. या निर्णयानंतर ब्रिटनमध्ये या वॅगनर सुमहाशी संबंध किंवा त्याचे समर्थन करणे बेकायदेशीर ठरणार आहे. याकरता संसदेत विधेयकही मांडले जाणार आहे. तसेच वॅगनर समुहाच्या मालमत्तांना दहशतवाद्यांची संपत्ती घोषित करत जप्त केले जाणार आहे.
वॅगनर समूह रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांचे एक सैन्य साधन होते. हा समूह हिंसक अन् विध्वंसक आहे. युक्रेन आणि आफ्रिकेतील या समुहाच्या कारवाया अत्यंत हिंसक होत्या. वॅगनरच्या कारवाया अस्थिरता निर्माण करणाऱ्या असून त्याद्वारे केवळ रशियाचे हितसंबंध जोपासले जात असल्याचा दावा ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेवरमॅन यांनी केला आहे.
वॅगनरचे भाडोत्री सैनिक हे दहशतवादी आहेत. वॅगनर आर्मीचे नाव आता दहशतवादी संघटनांच्या यादीत सामील केले जाणार असून यात हमास अन् बोको हराम सामील आहे. वॅगनरशी संबंध बाळगल्यास संबधिताला 14 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार असल्याचे ब्रेवरमॅन यांनी म्हटले आहे.
युक्रेनविरोधी युद्धात वॅगनर समुहाने रशियाकरता महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याचबरोबर सीरिया, माली आणि लीबिया यासारख्या आफ्रिकन देशांमधील रशियाच्या मोहिमांमध्ये वॅगनरचा समावेश राहिला आहे. वॅगनरच्या सदस्यांवर युक्रेनमध्ये नागरिकांचा छळ करणे आणि त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे.









