हुंबरट येथे अपघात; अन्य तिघांनाही गंभीर दुखापत
कणकवली : वार्ताहर
घाटकोपर – मुंबई येथून गोव्याला जाणारी भरधाव वेगातील वॅगनर कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर आदळली. हुंबरठ येथील उड्डाणपुलावर गुरुवारी सकाळी ९.४५ वा. सुमारास झालेल्या या अपघातात कारचालक प्रविण सुंदर शेट्टी (४०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रविण यांची पत्नी काव्या प्रविण शेट्टी (३५), मुलगी आर्वी प्रविण शेट्टी (९) व सिद्धेश भाऊसाहेब सटाले (३०. सर्व रा. मुंबई) यांनाही गंभीर दुखापती झाल्या. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थ, कणकवली पोलीस, महामार्ग पोलीस, वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना खासगी वाहनाद्वारे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अपघातात वॅगनर कारच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचुर झाला होता.









