इस्लामिक स्टेट, अलकायदा विरोधात लढत असल्याचा दावा
वृत्तसंस्था/ बामको
रशियात सत्तापालट घडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या वॅगनर समुहाचे प्रमुख येवगेनी प्रिगोजिन यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. या व्हिडिओत ते आफ्रिकेत दिसून येत आहेत. वॅगनर आफ्रिकेला आता अधिक स्वातंत्र्य मिळवून देत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आफ्रिका खंडात वॅगनर समुहाचे हजारो सदस्य सक्रीय झाले आहेत. आफ्रिकेतील देशांमध्ये खासगी सैन्य म्हणून वॅगनरची सेवा घेतली जात आहे.
आफ्रिकेत खनिजांचा शोध घेण्यासह दहशतवादी तसेच अन्य गुन्हेगारांशी आम्ही लढत आहोत. येथील तापमान 50 अंशापेक्षा अधिक आहे. आमचे सदस्य स्वत:च्या मेहनतीद्वारे रशियाला आणखी महान अन् आफ्रिकेला स्वतंत्र करत असल्याचे प्रिगोजिन यांनी म्हटले आहे.
माली अन् सीएआरमध्ये सक्रीय
आफ्रिकेतील लोकांसाठी न्यायपूर्ण आणि आनंदाचे वातावरण निर्माण करणे आमचे लक्ष्य आहे. इस्लामिक स्टेट आणि अल-कायदा यासारख्या संघटनांना येथून आम्ही हद्दपार करू. वॅगनर समुहात सातत्याने नियुक्ती होत असून आम्हाला देण्यात आलेले कार्य आम्ही पूर्ण करूच असे उद्गार प्रिगोजिन यांनी काढले आहेत. प्रिगोजिन यांचे भाडोत्री सैनिक सध्या माली आणि सेंट्रल रिपब्लिक आफ्रिकन रिपब्लिक (सीएआर) या देशांमध्ये सक्रीय असल्याचे समजते.
आफ्रिकेत वॅगनर समुहाकडून युद्धगुन्हे करण्यात आल्याचा आरोप संयुक्त राष्ट्रसंघाने केला आहे. ब्रिटनने मागील महिन्यात सीएआरमध्ये वॅगनरच्या दोन अधिकाऱ्यांवर नागरिकांचा छळ करणे आणि त्यांची हत्या करण्याचा आरोप करत निर्बंध लादले होते. यापूर्वी अमेरिकेने देखील या खासगी सैन्यावर आफ्रिकेतील सोन्याच्या साठ्याचा अवैध व्यवहार करण्याचा आरोप केला होता.
वॅगनर समुहाची मोठी कमाई
जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकन पूर्णपणे वॅगनर समुहाच्या विळख्यात सापडला आहे. वॅगनर समुहाला येथील सर्वात मोठ्या सोन्याच्या खाणीतून दरवर्षी 2,378 कोटी रुपयांची कमाई होत आहे. वॅगनर समूह आणि प्रिगोजिन यांनी अनेक बनावट कंपन्यांद्वारे सुरक्षा तसेच खाणकार्यासह सर्व प्रकारचे परवाने मिळविले आहेत.









