ऑनलाईन टीम / तरुण भारत :
ठाकरे गटाचे हकालपट्टी करण्यात आलेले रत्नाकर शिंदे यांना जिल्हाप्रमुख करण्यासाठी सुषमा अंधारे यांनी 25 लाख घेतले होते, असा आरोप अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी केला आहे.
रत्नाकर शिंदे हे केज येथे भागिदारीत कलाकेंद्र चालवत होते. या कलाकेंद्रावर अल्पवयीन मुलींचे शोषण केले जात होते. दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी या कलाकेंद्रावर धाड टाकून ही बाब समोर आणली. त्यानंतर ठाकरे गटाने रत्नाकर शिंदे यांना बीडच्या जिल्हाप्रमुख पदावरुन हटवले. त्यावर वाघमारे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
वाघमारे म्हणाले, राज्यभरातील कला केंद्र चालक सुषमा अंधारे यांच्या संपर्कात आहेत. पोलीस कारवाई होऊ नये, यासाठी मदत करण्याची ते अंधारे यांच्याकडे गळ घालतात. रत्नाकर शिंदे यांना बीडचे जिल्हाप्रमुख करण्यासाठी सुषमा अंधारे यांनी 25 लाख रुपये घेतले होते. तसेच कला केंद्र चालव मी आहे, पोलीस कारवाई होऊ देत नाही, असे म्हणत त्यांना पाठबळही दिले होते. कला केंद्रांवर चालणाऱया गैर प्रकारांना सुषमा अंधारे यांचे पाठबळ असून यासाठी त्या टक्केवारी घेतात. या सर्व प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी वैजनाथ वाघमारे यांनी केली आहे.