पगार वाढ व कराराचे नूतनीकरण नाहीच
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिकेतील रोजंदारीवर काम करणाऱया सुमारे 150 मजुरांना गेल्या चार महिन्यांपासून पगारवाढ करण्यात आलेली नाही. तसेच या मजुरांना 1 मे पासून नवीन करार करुन आदेश देणे गरजेचे होते. त्यांचा पूर्वीचा करार 30 एप्रिल 2022 रोजी संपला होता. त्यामुळे या रोजंदारीवरील मजुरांनी कामावर जाण्यास नकार दिला.
उपलब्ध माहिती प्रमाणे, 15 दिवसांपुर्वी या मजुरांच्या कामाचा नवीन आदेश (करार) काढण्यासाठी नगरपालिकेतील उच्चपदस्त अधिकाऱयांना कळवले होते. मात्र, अद्याप हा आदेश निघालेला नाही. काल सोमवारी या बद्दल निर्णय घेतला जाणार होता. पण, सोमवारी तसा आदेश निघाला नव्हता. काल सोमवारी कचरा गोळा करण्यासाठी किंवा इतर कामांसाठी पाकिलेचे जे कायमस्वरुपी कामगार आहेत त्यांनाच पाठविण्यात आले होते.
पालिका क्षेत्रात अद्याप मान्सून पूर्व कामांना प्रारंभ झालेला नसल्याने नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात मान्सून पूर्व कामे पूर्ण होणे आवश्यक असताना देखील त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नगरसेवक करू लागले आहेत. राज्यातील इतर पालिकांनी मान्सून पूर्व कामांना प्रारंभ झालेला आहे. मात्र, मडगाव पालिका अद्याप त्या दृष्टीकोनातून पावले उचलत नसल्याची तक्रार नगरसेवकांकडून होत आहे.
दरम्यान, रोजंदारीवरील मजुरांना जानेवारी 2022 पासून पगार वाढ झाली असून दिवसाकाठी 500 रुपयांवरुन 700 रुपये पगार वाढ झालेली आहे. मात्र, गत चार महिन्यांपासून 500 रुपयेच पगार दिल्याची माहिती रोजंदारीवरील कामगारांनी दिली. आम्हाला वाढीव पगार कधी मिळणार असा सवाल हे कामगार उपस्थित करीत आहेत.








