तहसिलदारांकडे माजी उपसरपंच मंथन गवस यांची नुकसान भरपाईची मागणी
प्रतिनिधी
बांदा
मंगळवारी 18 रोजी वाफोली गावठाण व अन्नपूर्णावाडी येथील ट्रान्सफॉर्मरचा लग्ज तुटल्याने वीजपुरवठा गरजेपेक्षा जास्त झाल्याने येथील अंदाजे 23 लोकांचे मोठे नुकसान झाले. यात ग्रामस्थांचे फ्रिज,टीव्ही, फॅन,ईन्व्हर्टर, मिक्सर, ड्रिलमशिन, कटर, ट्युब लाईट, एलईडी बल्ब, ईमर्जन्सी बल्ब, घरातील वायरींग ई.सामान जळून खूप मोठे नुकसान झालेले आहे. त्याबाबत नुकसान ग्रस्त नागरिकांना नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी वाफोली ग्रामपंचायत सदस्य तथा माजी उपसरपंच मंथन गवस यांनी सावंतवाडी तहसिलदार श्रीधर पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी त्यांनी वाफोली परिसरात येणाऱ्या पुर समस्येबाबत तहसिलदार पाटील यांच्याशी चर्चा केली.
मंगळवारी सायंकाळी वाफोली गावठाणवाडी व अन्नपूर्णावाडी येथील ग्रामस्थांचे ट्रान्सफॉर्मर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मोठे नुकसान झाले. यात अनेक ग्रामस्थांचे घरातील किंमती वस्तू जाळून खाक झाल्यात. येथील महावितरणच्या गलथान कारभारामुळे हे नुकसान झालेले आहे.
लाईनवरिल झाडी न तोडणे, अर्थींग, कंडक्टर्स नूतनीकरण, आवश्यक तेथे स्पेसर बसवणे, कमी दाबाने विद्युत पुरवठा ही कामे न केल्याने ही नुकसानी झालेली आहे . त्यामुळे नुकसानभरपाई मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून येथील ग्रामस्थांना नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी मंथन गवस यांनी केली. यावर तहसीलदार पाटील यांनी आपण याबाबत संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करून नुकसान भरपाई मिळविण्यासाठी प्रयत्न करीन तसेच त्यांच्या वरिष्ठांना सुद्धा ही बाब कळवू असे सांगितले









