वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीपासून सुरू झालेला राजकीय हिंसाचार अद्याप कमी झालेला नाही. मतमोजणीदरम्यान मंगळवारी रात्री झालेल्या दोन राजकीय गटात झालेल्या संघर्षात आणखी तिघांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण 24 परगणामधील दोन भागात मंगळवारी रात्री हिंसाचाराच्या घटना घडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. राज्यातील निवडणूक हिंसाचारात आतापर्यंत 42 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. बंगालमधील लोकांची मने जिंकण्यात अपयशी ठरलेल्या भाजपने सूड उगवल्याचा आरोप टीएमसीने केला आहे. निवडणुकीपूर्वी बंगालच्या जनतेची सेवा करण्याचा दावा करणारे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी आता हिंसाचाराला चिथावणी देत असल्याचेही तृणमूलने म्हटले आहे.
पहिली घटना भंगार भागात घडली असून जिथे आयएसएफ आणि तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. आयएसएफचे कार्यकर्ते हल्ला करण्यासाठी पोलिसांच्या गणवेशात आल्याचा आरोप मृतांच्या कुटुंबीयांनी केला आहे. दुसरी घटना रायदिघी येथे घडली असून येथे भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये संघर्ष झाला.









