वीज दरात प्रतियुनिट 70 पैसे वाढ : 1 एप्रिलपासून लागू
प्रतिनिधी/ बेंगळूर
विधानसभा निकालाला एक दिवस शिल्लक असतानाच राज्यातील जनतेला ‘शॉक’ बसला आहे. कर्नाटक विद्युत नियमन आयोगाने (केईआरसी) वीज दरात वाढ करण्याची परवानगी वीज वितरण कंपन्यांना दिली आहे. त्यानुसार प्रति युनिट 70 पैसे दरवाढ केली जाणार आहे. ही दरवाढ 1 एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे.
वीज वितरण कंपन्यांनी (एस्कॉम) 146 पैसे प्रति युनिट वीज दरवाढीची मागणी केली होती. मात्र, केईआरसीने 70 पैसे दरवाढ करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे ग्राहकांचे वीज बिल सरासरी 8.31 टक्क्मयांनी वाढण्याची शक्मयता आहे. अशी माहिती केईआरसीने शुक्रवारी प्रसिद्धीपत्रकात दर वाढीचा तपशील दिला आहे.
विविध वीज वितरण कंपन्यांनी 2023-24 या वर्षात प्रति युनिट दर 120 ते 146 पैशांनी वीज दरवाढ करण्याची विनंती केली होती. वीज वितरण कंपन्यांना 4,457.12 कोटी ऊपयांचा महसूल तुटवडा (महसूल तुटवडा) सहन करावा लागत आहे. कोळसा आणि त्याच्या वाहतूक खर्चात वाढ झाल्याने वीज खरेदीवरील खर्चाच्या रकमेत 13 टक्क्मयांनी वाढ झाली आहे. कर्मचाऱ्यांचे पगार आणि विविध भत्ते 20 टक्क्यांनी वाढविण्यात आले. या व्यतिरिक्त भांडवली गुंतवणुकीचे प्रमाण वाढल्यामुळे आणि बँक कर्जावरील व्याजदर वाढल्यामुळे खर्च 30 टक्के वाढला.
वीज वितरण कंपन्यांचा वाढता खर्च लक्षात घेऊन वीज नियामक आयोगाने सर्व प्रकारच्या वीजेसाठी प्रति युनिट 70 पैसे दरवाढ करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या बिलात 8.31 टक्के वाढ होणार आहे. हे पाऊल एलटी (कमी दाबाची वीज) आणि एचटी (उच्च दाबाची वीज) या दोन्ही ग्राहकांना लागू होईल. सुधारित दर 1 एप्रिलपासूनच लागू होतील, असे आयोगाने म्हटले आहे.









