बेळगाव / प्रतिनिधी :
विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचे ( व्हीटीयू ) कुलगुरु प्रा. करिसिद्धप्पा यांच्या निवृत्तीमुळे रिक्त होत असलेल्या पदावर वर्णी लागण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे. या स्पर्धेत डॉ. एस. विद्याशंकर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गोवाचे संचालक गोपाळ मुगेरया आणि बेळगावचे डॉ. ए. एस. देशपांडे हे तिघेजण आघाडीवर असून सोमवार दि. २६ रोजी कुलगुरु निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे.
प्रा. करिसिद्धप्पा यांनी तब्बल सहा वर्षे अतिशय सक्षमपणे आणि कोणताही आरोप न होऊ देता आपला कार्यकाळ यशस्वीपणे पार पाडला. पण असे असतानाही मात्र शेवटच्या टप्प्यात व्हीटीयूच्या विकासासाठी त्यांनी केलेली कामे, राबवलेल्या योजनांवर काही जणांनी आक्षेप घेतला आहे. पण हा राजकारणाचा भाग असल्याचे बोलले जात आहे.
कुलगुरूपदाच्या शर्यतीमध्ये असणारे आणखी एक स्पर्धक व म्हैसूरस्थित कर्नाटक मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एस. विद्याशंकर यांच्यावरही आरोप आहेत. मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु असताना आरटीआयद्वारे माहिती विचारलेल्या एका व्यक्तीवर त्यांनी हल्ला केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. चार वर्षांच्या कुलगुरु काळात वाहन खरेदी घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. कुलगुरुपदाचे प्रबळ दावेदार असणाऱ्या या दोघांविरुद्ध फौजदारी स्वरुपाचे आरोप असल्याने विद्यापीठाच्या प्रतिष्ठेला धक्का तर पोचणार नाही ना अशी भीती व्यक्त होत आहे.
या दोघांबरोबरच कुलगुरुपदाच्या शर्यतीत बेळगावचे डॉ. ए. एस. देशपांडे हे प्रबळ दावेदार आहेत. डॉ. ए एस देशपांडे हे बेळगावचे असून शैक्षणिक क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव आहे. ते सध्या व्हीटीयूचे निबंधक म्हणून कार्यरत असून स्वच्छ चारित्र्याचे व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे व्हीटीयूचे नूतन कुलगुरु म्हणून त्यांची नियुक्ती व्हावी, अशी अनेकांची अपेक्षा आहे.








