व्हीपीपी अंतरगत फुटबॉल स्पर्धा : ब्ल्यू लॉक उपविजेता
बेळगाव : वसंतराव पोतदार अभियांत्रिकी महाविद्यालय आयोजित महाविद्यालय आंतरगत फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फ्युजन संघाने ब्ल्यू लॉक संघाचा टायब्रेकरमध्ये 3-2 असा पराभव करुन स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. केएलएस गोगटे महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित या स्पर्धेत पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात ब्ल्यू लॉक संघाने व्हीपीपी फर्स्ट इयर संघाचा सडन डेथमध्ये 4-3 असा पराभव केला. या सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघाने गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने पंचांनी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये दोन्ही संघांनी 3-3 अशी बरोबरी केली. ब्ल्यू लॉकतर्फे तेजस पाटील, आदर्श गावकर व शशांक बोळगुंडी यांनी गोल केले. तर व्हीपीपीतर्फे हर्षन, वृषभ, अमोल यांनी गोल केले. त्यानंतर पंचांनी सडनडेथ नियमाचा वापर केला. ब्ल्यू लॉक संघाने व्हीपीपीचा 4-3 असा पराभव केला. सडनडेथमध्ये बलरामने ब्ल्यू लॉकतर्फे गोल केला. तर व्हीपीपीतर्फे राहूलने चेंडू बाहेर मारला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात फ्यूजन संघाने विझार्ड संघाचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात 15 व्या मिनिटाला श्रीजीतने पहिला गोल करुन 1-0 अशी आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 14 व्या मिनिटाला फ्युजनतर्फे साईराजने गोल करुन 2-0 ची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात विझार्ड संघाला गोल करण्यात अपयश आले.
अंतिम सामन्याचे उद्घाटन व्हीपीपीचे प्राचार्या एस. एस. मालाज क्रीडा सचिव प्रतिक लोहार व इतर प्राध्यापकांच्या हस्ते ब्ल्यू लॉक व फ्यूजन संघाच्या खेळाडूंची ओळख करुन करण्यात आले. या सामन्यात 16 व्या मिनिटाला ब्ल्यू लॉकच्या तेजस पाटीलने गोल करण्याची नामी संधी दवडली. 19 व्या मिनिटाला फ्यूजनच्या साईराजने मारलेला वेगवान फटका ब्ल्यू लॉकच्या गोलरक्षकाने उत्कृष्ट अडविला. त्यामुळे गोलफलक पहिल्या सत्रात कोराच राहिला. दुसऱ्या सत्रात पुन्हा दोन्ही संघांनी गोल करण्याच्या नामी संधी दवडल्याने सामना शून्य बरोबरीत राहिला. त्यामुळे पंचांनी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्य फ्युजन संघाने ब्ल्यू लॉक संघाचा 3-2 असा पराभव करीत स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. फ्युजनतर्फे श्रीजीत, साईराज, संकेत यांनी गोल केले. तर ब्ल्यू लॉकतर्फे शशांक बोळगुंडी व तेजस पाटील यांनी गोल केले. तर आदर्शने चेंडू बाहेर मारला. सामन्यानंतर व्हीपीपीच्या प्राचार्या एस. एस. मालाज, सचिव प्रतिक लोहार व इतर प्राध्यापक वर्गाने विजेत्या व उपविजेत्या संघाचा गौरव केला. या स्पर्धेसाठी पंच म्हणून केएलएस हायस्कूलचे क्रीडा शिक्षक उमेश मजूकर व आयएमईआरचे क्रीडा प्राध्यापक जॉर्ज रॉड्रीक्स यांनी काम पाहिले. तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी व्हीपीपीच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.









