विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याच्या प्रचारतोफा थंडावल्या
वृत्तसंस्था/ रांची
झारखंड विधानसभा निवडणूक-2024 च्या पहिल्या टप्प्यातील 43 जागांसाठी बुधवारी मतदान होणार आहे. तत्पूर्वी सोमवारी सायंकाळी या क्षेत्रातील जाहीर प्रचार सोमवारी थांबला. आता या मतदारसंघांमध्ये सभा, रोड शो आणि जाहीर प्रचार होणार नाही. उमेदवार केवळ घरोघरी प्रचार करू शकतील. पहिल्या टप्प्यात निवडणूक होणाऱ्या 43 मतदारसंघांमध्ये 6 एससी आणि 20 एसटी जागांचा समावेश आहे. या टप्प्यात एकूण 683 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.
पहिल्या टप्प्यासाठी 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून मतदान होणार आहे. काही संवेदनशील बूथ वगळता बहुतांश बूथवर सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. झारखंडमधील काही भाग दुर्गम आणि नक्षलप्रवण क्षेत्रात असल्यामुळे येथील मतदानाच्या वेळेत फरक ठेवण्यात आलेला आहे. काही संवेदनशील बूथवर दुपारी 4 वाजेपर्यंतच मतदान होणार आहे. यामध्ये सर्व दुर्गम ग्रामीण भागातील बूथचा समावेश आहे. अन्यत्र सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
पहिल्या टप्प्यात निवडणूक होणाऱ्या 43 मतदारसंघांमध्ये 6 एससी आणि 20 एसटी जागांचा समावेश आहे. या टप्प्यात 683 उमेदवारांपैकी 334 अपक्ष आहेत. एकूण उमेदवारांपैकी 87 उमेदवार हे राष्ट्रीय पक्षांचे आहेत. तर 32 उमेदवार हे झारखंडच्या मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे आहेत. इतर मान्यताप्राप्त पक्षांच्या तिकिटांवर 42 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. एकूण 188 उमेदवार अनोळखी नोंदणीकृत पक्षांशी संबंधित आहेत. या टप्प्यात एकूण 73 महिला उमेदवारांचे भवितव्यही निश्चित होणार असून, त्यापैकी 34 अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. पहिल्या टप्प्यात तृतीयपंथी उमेदवारही रिंगणात आहे. नगमा राणी हटिया विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.
बड्या उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला
निवडणुकीच्या या टप्प्यात माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्याशिवाय मंत्री रामेश्वर ओराव, रामदास सोरेन, बन्ना गुप्ता, मिथिलेश ठाकूर, दीपक बिऊवा, बैद्यनाथ राम, सी. पी. सिंह, सरयू राय, भानूप्रताप शाही, नीरा यादव, नीलकंठ सिंग मुंडा, रामचंद्र चंद्रवंशी, कमलेश कुमार सिंग, के. एन. त्रिपाठी, गोपालकृष्ण पातर ऊर्फ राजा पीटर आदी नेत्यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. निवडणुकीच्या या टप्प्यात ओडिशाचे राज्यपाल आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांची सून पूर्णिमा दास, मंत्री सत्यानंद भोक्ता यांची सून रश्मी प्रकाश, चंपाई सोरेन यांचा मुलगा बाबूलाल सोरेन यांच्या भवितव्याचाही फैसला होणार आहे.









