कोल्हापूर प्रतिनिधी
जिल्ह्यातील ग्रामपंचायत आणि काही गावातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. जिल्ह्यातील ७४ ग्रामपंचायतींसाठी तर १२ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. रविवारी सकाळपासून मतदान केंद्रांवर मतदार आपले मत नोंदवण्यासाठी जात आहेत. या दरम्यान काही ठिकाणी चुरस पाहायला मिळत आहे.
बहिरेश्वर ग्रामपंचायतीसाठी चुरशीने मतदान सुरू
बहिरेश्वर ( ता करवीर) येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आकरा जागांसाठी बावीस उमेदवार निवडणूक रिंगणात असून सरपंच पदासाठी एका अपक्षासह तीन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत .दोन पॅनेल मध्ये सरळ दुरंगी व चुरशीची लढत होत आहे .दोन्ही गटाकडून जोरदार प्रचार यंत्रणा राबवत मतदारांना आपलेसे करण्याचा शर्थीने प्रयत्न केले आहेत . सकाळ पासूनच अगदी चूरशीने व शांततेत मतदान सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सांगरूळमध्ये पोटनिवडणुकीसाठी चुरशीची लढत
सांगरूळ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीमध्ये एका जागेसाठी दोन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याने दुरंगी चुरशीची लढत होत आहे .सांगरुळ ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक चार मध्ये ही पोटनिवडणूक होत असून ६४४ पुरुष व ६०८ स्त्री असे एकूण १२५२ मतदान आहे. सकाळी मतदानास सुरुवात झाल्यानंतर केंद्रावर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या . दुपारपर्यंत साडेचारशे मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
शिरोली दुमाला, गणेशवाडी, धोंडेवाडी येथे शांततेत 50% मतदान सुरु
ग्रामीण भागात मिनी विधानसभा म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीकडे पाहिले जाते.या टप्प्यात करवीर मध्ये 5 गावात ग्रामपंचायत निवडणूक व 3 गावात पोटनिवडणूक आज होत आहे .यामध्ये करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला गणेशवाडी,धोंडेवाडी या तीन गावांमध्ये सकाळी आठ वाजल्यापासून मतदानात सुरवात झाली.
शिरोली दुमाला येथे 5 वॉर्डमध्ये 4500 मतदार आहेत. यामध्ये वॉर्ड 1 मध्ये 1132 पैकी 550 मतदान , वॉर्ड 2 मध्ये 1140 पैकी 545 , वॉर्ड 3 मध्ये 708 पैकी 300 , वॉर्ड 4 मध्ये 629 पैकी 300, वॉर्ड 5 मध्ये 1148 पैकी 550 मतदान झाले आहे.गणेशवाडी ता. करवीर येथे एकूण मतदान 1663 मतदार आहेत. वॉर्ड 1 मध्ये 505 पैकी 250 , वॉर्ड 2 मध्ये 569 पैकी 255, वॉर्ड 3 मध्ये 589 पैकी 250 मतदान झाले आहे. धोंडेवाडी येथे एकूण 562 मतदार आहेत. यामध्ये वॉर्ड 1 मध्ये 246 पैकी 150 , वॉर्ड 2 मध्ये 143 पैकी 100 , वॉर्ड 3 मध्ये 173 पैकी 115 मतदान झाले आहे. वरील आकडेवारीनुसार आत्तापर्यंत 50 % मतदान पूर्ण झाले आहे.
मतदान ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी करवीर पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काळे,शिवाजीराव करे,फौजदार रणजीत देसाई,गोपनियचे अविनाश पवार व टीम यांनी चौक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.त्यामुळे अतिशय शांततेत दुपारपर्यंतचे मतदान सुरू आहे.
बहिरेश्वर येथे चूरशीने ९० .२६ टक्के मतदान
बहिरेश्वर (ता करवीर) ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी २८८७ पैकी २६०६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून ९०.२३ टक्के मतदान झाले आहे . सकाळी मतदानात सुरुवात झाल्यानंतर मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या .संपूर्ण मतदान प्रक्रिया शांत़तेत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सरपंच पदासाठी एका अपक्षासह तीन उमेदवार निवडणूक रिंगणात होते..तर सदस्य पदासाठी ११ जागासाठी २२ उमेदवार रंणागणात होते..
प्रभाग क्रमांक १ मध्ये७५५ पैकी ६८३
प्रभाग क्रमांक२ मध्ये २० पैकी ७३५
प्रभाग क्रमांक ३ मध्ये ५६७ पैकी ५०८
प्रभाग क्रमांक ४ मध्ये ७४५ पैकी ६८०
असे एकुण २६०६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.दोन्ही गटांनी विजय आपलाच असलेचा दावा केला आहे .
शिरोली दुमाला 87.25%, गणेशवाडी 95.34%, धोंडेवाडीत 96 % चुरशीने मतदान . सोमवारी लागणार निकाल
करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला, गणेशवाडी, धोंडेवाडी ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान झाले. सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदाराच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी 12 वाजेपर्यंत 50% मतदान झाले होते. सायंकाळ पर्यंत शिरोली दुमाला येथे 87.25%, गणेशवाडी येथे 95.34% तर धोंडेवाडी येथे 96% मतदान झाले. सर्व ठिकाणी चुरशीने मतदान झाले.जास्तीत जास्त मतदार मतदान केंद्रावर आणण्यासाठी सर्व पॅनेलचे कार्यकर्त्यांची धावपळ दिसत होते. पॅनेलचे प्रमुख, लोकनियुक्त सरपंच व ग्रामपंचायत सदस्य पदाचे उमेदवार दिवसभर बुथवर ठाण मांडून होते.
शिरोली दुमाला येथे सरपंचपदासाठी ग्रामविकास आघाडीचे उमेदवार गोकुळचे संचालक विश्वास पाटील यांचे चिरंजीव सचिन पाटील यांच्या विरोधात लोकशाही ग्रामविकास आघाडीचे उमेदवार तुळशी समूहाचे नेते कै. शिवाजीराव पाटील यांचे चिरंजीव सरदार पाटील हे उभे आहेत. तसेच मानसिंग पाटील, बळवंत पाटील- किल्लेदार, शंकर कौलवे हेही सरपंच पदासाठी अपक्ष म्हणून रिंगणात होते. 13 ग्रामपंचायत सदस्य पदासाठी जागा असून 4553 पैकी 3973 इतके मतदान झाले.येथील निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
गणेशवाडी येथे ग्रामविकास पॅनेलचे सरपंच पदाचे उमदेवार माणकू दिनकर माने विरुद्ध शिवसेना-काँग्रेस फुटीर गटाचे जनसेवा ग्रामविकास आघाडीचे उमदेवार सारिका शिवाजी माने आहेत. प्रभाग 3 मधील शोभा निवृती माने या भावेश्वरी ग्रामविकास पॅनेलची एक जागा बिनविरोध झाल्याने ८ सदस्य पदासाठी मतदान झाले. एकूण 1653 पैकी 1576 मतदान झाले आहे.
धोंडेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कॉंग्रेस प्रणित शंभो महादेव ग्रामविकास पॅनेल विरुद्ध काँग्रेस – शिवसेनेची शिवपार्वती ग्रामविकास आघाडी आमनेसामने आहे. लोकनियुक्त सरपंच व 7 ग्रामपंचायत सदस्य जागेसाठी रंगत होती. 562 पैकी 560 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर घानवडे येथे एका जागेसाठी मतदान झाले.
दरम्यान सर्व मतदान केंद्रावर करवीर पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काळे,शिवाजीराव करे,फौजदार रणजीत देसाई,गोपनीय हवलदार अविनाश पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
पन्हाळा तालुक्यात चौदा ग्रामपंचायतीसाठी ८७.२२ टक्के मतदान
पन्हाळा तालुक्यात १४ (चौदा) ग्रामपंचायतीसाठी सर्वच ठिकाणी शांततेत ८७.२२ टक्के मतदान झाले.किरकोळ बचबाचीचा अपवाद काही ठिकाणी घडले तरी सकाळच्या सत्रात मतदानाचा असलेला जोर शेतीची कामे व उन्हाच्या कडक्यामुळे दुपारी काहीसा मंदावलेला होता. पण शेवटच्या सत्रात जोमाने मतदान झाले.
यामध्ये खोतवाडी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य बिनविरोध झाल्याने फक्त सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत चुरशीने ८७.५२ टक्के मतदान झाले तर सर्वाधिक मतदान वाळवेकरवाडी येथे ९७.७६ टक्के तर बोरिवडे येथे सर्वात कमी ८१. ३० टक्के मतदान झाले.सोमवारी दि.६ रोजी सकाळी १० वाजले पासून पन्हाळा येथील मोरोपंत ग्रंथालय सभागृहात आठ टेबलवर दोन फेरीत मतमोजणी होणार आहे.