
बेळगाव : साऱ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या विधानसभा निवडणुकीचे मतदान बुधवार दि. 10 मे रोजी होत आहे. सकाळी 7 पासून सायंकाळी 6 पर्यंत मतदान करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. जिल्ह्यातील 18 मतदारसंघामध्ये 39 लाख 47 हजार 150 मतदार आहेत. तर 20 हजार 424 पोस्टल मतदार आहेत. त्यांचे मतदान झाले आहे. आता उर्वरित मतदान होणार असून जिल्हा प्रशासनाने सर्व ती तयारी पूर्ण केली आहे. जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी जिल्ह्यातील जनतेला मतदानाला पुढे येण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यामध्ये एकूण 18 मतदार संघामध्ये 187 जण रिंगणात आहेत. त्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनानेही आचारसंहिता भंग होवू नये यासाठी निवडणूक जाहीर झाल्यापासून प्रयत्न केले आहेत. त्याला बऱ्यापैकी यश आले आहे. बुधवारी मतदानाचा मुख्य दिवस असून ही मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्कपणे काम करत आहे.
4 हजार 434 मतदान केंद्रे
18 मतदारसंघामध्ये एकूण 4 हजार 434 मतदान केंद्रे आहेत. तर 5 अतिरिक्त मतदान केंद्रेही सज्ज ठेवण्यात आली आहेत. एकूण 4 हजार 439 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. 18 ते 19 वयोगटातील 94 हजार 652 मतदार आहेत तर 80 वर्षे पूर्ण झालेले 1 लाख 95 हजार मतदार आहेत. मतदान केंद्रांमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रांवर एक निवडणूक अधिकारी, तीन निवडणूक कर्मचारी तसेच एक हेडकॉन्स्टेबल किंवा कॉन्स्टेबल नेमणूक करण्यात आले आहे.
दिव्यांग तसेच ज्येष्ठ मतदारांसाठी विशेष सोय
दिव्यांग तसेच ज्येष्ठ मतदारांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी व्हिलचेअरही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मतदारांना मतदानाची स्लीप पोहोचविण्याचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे मतदान केंद्रांमध्ये जाऊन मतदान करणे हे सोयीचे होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.
पावसाची शक्यतेमुळे सर्व मतदान केंद्रांमध्ये खबरदारी
पावसाची शक्यता असल्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांमध्ये योग्य ती खबरदारी घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. बऱ्याच शाळांना गळती लागली आहे. त्यासाठी ताडपत्री खरेदी करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे. निवडणूक अधिकाऱ्यांना तसेच मतदारांनाही मतदान केंद्रांवर पाण्याची सोय करण्यात आली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांना नास्टा, जेवण याची सोय करण्यात आली आहे.
मतदान केंद्रांच्या परिसरात 144 कलम लागू
मतदान केंद्रांच्या परिसरात 144 कलम लागू करण्यात आला आहे. 200 मीटरपर्यंत कोणालाही टेबल ठेवता येणार नाही. याचबरोबर त्या परिसरात प्रचारही करता येणार नाही. नव्याने दाखल झालेल्या मतदारांची नावे जर मतदार यादीमध्ये असतील मात्र मतदान कार्ड आले नाही तरी त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र यासाठी कोणतेही एक ओळखपत्र आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यामधील 18 मतदारसंघासाठी एकूण 21 हजार 688 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर 21 हजार 112 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे तर मायक्रो ऑब्झरवर म्हणून 576 जणांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये सध्या आणण्यात आलेली ईव्हीएम यंत्रेही पूर्ण नवीन आहेत. त्यामुळे बिघाड होण्याची शक्यता कमी असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. तरी देखील कोणत्याही यंत्रामध्ये बिघाड झाल्यानंतर काही तांत्रिक अधिकाऱ्यांची देखील नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. प्रत्येक मतदान केंद्रांमध्ये चार ते पाच हजारपर्यंतच मतदान घेतले जाणार आहे. त्या पध्दतीनेच मतदान केंद्रांची संख्या करण्यात आली आहे.
पोलीस बंदोबस्त
विधानसभा मतदानासाठी सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारे शांतता भंग होवू नये, याचबरोबर मतदान प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी पोलीस प्रशासनाने देखील संपूर्ण तयारी केली आहे. 4 हजार 803 पोलीस, याचबरोबर 1354 होमगार्डस्, केएसआरपीच्या 19 तुकड्या, जिल्हा राखीव दलाच्या 249 तुकड्या आणि सीएपीएफच्या 53 तुकड्या देखील तैंनात असणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक हेड कॉन्स्टेबवल किंवा कॉन्स्टेबल यांची नेमणूक करण्यात आली आहे.
प्रथमच सखी पोलिंग बुथ
निवडणूक आयोगाने या निवडणुकीत अनेक नवनवीन संकल्पना कार्यान्वित केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील 18 मतदारसंघापैकी 5 पोलिंग बुथवरती महिलांचीच नियुक्ती करण्यात येणार आहे. या पोलिंग बुथला ‘सखी’ असे नाव देण्यात आले. या पोलिंग बुथवर सर्व निवडणूक कर्मचारी, पोलीस आणि सुरक्षा रक्षक या महिलाच असतील. लिंगसमानतेकडे (जेंडर इक्वॅलिटी) एक पाऊल म्हणून आयोगाने ही संकल्पना राबविली आहे.
यंग पोलिंग बुथ
राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांपैकी एका पोलिंग बुथला यंग पोलिंग स्टेशन असा दर्जा देण्यात येणार आहे. म्हणजे याच पोलिंग बुथवर सर्वाधिक तरुण अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. अर्थातच तरुण सुरक्षा रक्षक, निवडणूक कर्मचारी, पोलीस यांची येथे नियुक्ती असेल.









