निवडणूक कार्यक्रमात आयोगाकडून बदल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. सुधारित कार्यक्रमानुसार आता 23 नोव्हेंबर ऐवजी 25 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तसेच नियोजित वेळापत्रकानुसार 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी अन्य चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणीही होणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी मोठ्या प्रमाणात होणारे लग्न समारंभ/सामाजिक कार्यक्रम लक्षात घेऊन मतदानाची तारीख बदलण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
निवडणूक आयोगाने सोमवारी राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरामच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. पूर्वनियोजनानुसारर राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख 23 नोव्हेंबर जाहीर करण्यात आली होती. मात्र, त्यादिवशी मोठ्या प्रमाणात विवाह आणि सामाजिक कार्यक्रमांचा हवाला देत विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांनी मतदानाच्या तारखेत बदल करण्याची विनंती केली होती. ही विनंती मान्य करत निवडणूक आयुक्तांनी 23 ऐवजी 25 नोव्हेंबर ही मतदानाची नवी तारीख जाहीर केली आहे. 23 नोव्हेंबर या दिवशी मतदान केल्याने मोठ्या संख्येने लोकांची गैरसोय होऊ शकते. तसेच निवडणूक साधनांची ने-आण करणे आणि मतदानादरम्यान मतदारांचा सहभागही कमी असू शकतो, हे गृहीत धरून तारखेत सुधारणा करण्यात आली.
राजस्थानमधील निवडणूक कार्यक्रम
(विधानसभेच्या एकूण जागा – 200)
अधिसूचना : 30 ऑक्टोबर 2023
अर्ज दाखल करण्याची मुदत : 6 नोव्हेंबर 2023
अर्जांची छाननी : 7 नोव्हेंबर 2023
अर्ज माघार : 9 नोव्हेंबर 2023
मतदान : 25 नोव्हेंबर 2023
मतमोजणी : 3 डिसेंबर 2023









