पुढील महिन्यात तारखा जाहीर होण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ गांधीनगर
गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पुढील महिन्यात तारखांची घोषणा होऊ शकते. नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवडय़ापर्यंत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. नोव्हेंबरच्या तिसऱया आणि चौथ्या आठवडय़ात मतदान होऊ शकते. राज्यात दोन टप्प्यामंध्ये मतदान होण्याची शक्यता आहे. मुख्य निवडणूक आयुक्त गुजरातची राजधानी गांधीनगरच्या दौऱयावर होते. तेथे त्यांनी गृह मंत्रालयाचे अधिकारी, राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱयांसोबत बैठक घेतली आहे.
या बैठकीतच राज्य विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाला अंतिम स्वरुप देण्यात आल्याचे मानले जाते. केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक दोन दिवसांच्या गुजरात दौऱयावर आहे. हे पथक निवडणूक आणि मतदानाच्या तयारींचा आढावा घेणार आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीवरून मंगळवारी दुपारी केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद आयोजित केली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनूप चंद पांडे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक राज्यात पोहोचले आहे. आयोगाच्या पथकाने यापूर्वी दोन दिवसांचा राज्याचा दौरा केला होता. अहमदाबादमध्ये सर्व जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांसोबत त्यांनी बैठक घेतली होती.
आयोगाच्या पथकाने मतदारयादी, मतदान केंद्र, संवेदनशील केंद्र, सुरक्षा व्यवस्थेसमवेत अनेक मुद्दय़ांवर चर्चा केली आहे. जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांनी स्वतःच्या जिल्हय़ामधील निवडणूक तयारीसंबंधीची माहिती दिली आहे.
तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांनी नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत निवडणूक होण्याची शक्यात असल्याचे म्हटले आहे. गुजरातमध्ये यंदा निवडणुकीला त्रिकोणी स्वरुप प्राप्त होऊ शकते. भाजप आणि काँग्रेससह आम आदमी पक्षानेही राज्यात प्रचाराला मोठे स्वरुप दिले आहे. 182 सदस्यीय विधानसभेत सध्या भाजपचे 111 तर काँग्रेसचे 63 आमदार आहेत. राज्यात भाजपचे सरकार असून भूपेंद्र पटेल हे मुख्यमंत्री आहेत.









