राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि आयएनडीआयए यांच्यातील प्रथम संघर्ष
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सहा राज्यांमधील सात विधानसभा पोटनिवडणुकांसाठी मतदान समाप्त झाले आहे. केरळमध्ये एक, पश्चिम बंगालमध्ये एक, त्रिपुरामध्ये दोन, झारखंडमध्ये एक, उत्तर प्रदेशमध्ये एक, तर उत्तराखंडमध्ये एक अशा या जागा आहेत. आयएनडीआयए आघाडी स्थापन झाल्यानंतरचा हा राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि ही आघाडी यांच्यातील प्रथम संघर्ष असल्याने त्याला महत्व देण्यात येत आहे. या पोटनिवडणुकांची मतगणना येत्या शुक्रवारी होत आहे.
आणखी नऊ महिन्यांमध्ये लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक आहे. तसेच या निवडणुकीच्या आधी तेलंगणा, राजस्थान, त्रिपुरा, मध्यप्रदेश, छत्तीसगड आदी राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पोटनिवडणुकांना त्या पार्श्वभूमीवर पाहण्यात येत असून सर्व राजकीय पक्षांमध्ये चुरस आहे.
साठ टक्क्यांहून अधिक मतदान
या सात पोटनिवडणुकांमध्ये सरासरी साठ टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली. अंतिम आकडेवारी यापेक्षा अधिक असू शकते. केरळ, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये मतदानाने 70 ची टक्केवारी ओलांडली होती. इतरत्रही मतदारांमध्ये उत्साह दिसून आला होता. महिलांनीही मतदानात मोठ्या प्रमाणात भाग घेतला.
घोशी अत्यंत महत्वाचा मतदारसंघ
उत्तर प्रदेशातील घोशी हा मतदारसंघ महत्वाचा मानण्यात येत आहे. येथे आयएनडीआयए आघाडीचे सर्व पक्ष एकत्रिरित्या लढत आहेत. मात्र, मायावतींच्या बहुजन समाज पक्षाने या आघाडीला पाठिंबा दिलेला नाही. समाजवादी पक्षाचे आमदार दारासिंग यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. आयएनडीआयएची ही पहिली परीक्षा मानली जात आहे.
बॉक्स
पुढील प्रमाणे मतदान…
राज्य जागा मतदान
केरळ पुथुपल्ली 72 टक्के
पश्चिम बंगाल धुपगुरी 75 टक्के
झारखंड दुमरी 70 टक्के
उत्तराखंड बागेश्वर 68 टक्के
उत्तर प्रदेश घोशी 60 टक्के
त्रिपुरा धनपूर 80 टक्के
बोक्सानगर 80 टक्के









