वृत्तसंस्था /नवी दिल्ली
राज्यसभेच्या 10 जागांसाठी 24 जुलैला निवडणूक होणार असून त्यात गोव्यातील एका जागेचा समावेश आहे. सध्या भाजपचे विनय तेंडुलकर हे राज्यसभेचे गोव्यातील मावळते खासदार आहेत. येत्या निवडणुकीसाठी भाजपकडून विद्यमान भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. पश्चिम बंगालमधील 6, गुजरातमधील 3 तर गोव्यातील एका जागेकरता ही निवडणूक होणार आहे. पश्चिम बंगालमधून डेरेक ओ ब्रायन, डोला सेन, प्रदीप भट्टाचार्य, सुष्मिता देव, शांता छेत्ती आणि सुखेंदु शेखर रे यांचा कार्यकाळ 18 ऑगस्ट रोजी समाप्त होणार आहे. गुजरातमधून विदेशमंत्री एस. जयशंकर, दिनेश जेमलभाई अनावडिया आणि लोखंडवाला जुगल सिंह माथुरजी यांचा कार्यकाळही त्याच दिवशी संपणार आहे. गोव्यातून विनय तेंडुलकर यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ 28 जुलैला समाप्त होणार आहे. एस. जयशंकर हे विदेशमंत्री असल्याने राज्यसभेवर त्यांची निवड होणे निश्चित मानले जात आहे. भाजपकडून दोन नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. गुजरातमधील तिन्ही जागा भाजपच जिंकू शकतो.राज्यसभा निवडणुकीसाठी 13 जुलै रोजी उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. तर 17 जुलैपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये राज्यसभेच्या एका जागेकरता 24 जुलै रोजीच पोटनिवडणूक होणार आहे. तृणमूलच्या खासदाराने राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक होणार आहे.









