घरोघरी जाऊन केला प्रचार
वार्ताहर /कुद्रेमनी
100 वर्षे पूर्ण झालेल्या वयोवृद्ध नागरिकांनी येत्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यांना मतदान प्रक्रियेची माहिती देवून त्यांचा सत्कार करण्याचा उपक्रम कुद्रेमनी ग्रामपंचायतीने वयोवृद्धांच्या घरोघरी जाऊन शनिवारी गावात राबविला. गावातील वयाची 100 वर्षे पूर्ण केलेले वयोवृद्ध राघो रवळू माळी, त्यांची पत्नी लक्ष्मी राघो माळी, परशराम खि. गोवेकर, लक्ष्मी रवळू राजगोळकर, देवकाबाई भरमाणा तरवाळ, यलुबाई परशराम नाईक, लक्ष्मी दुर्गाप्पा तरवाळ यांचा शाल, श्रीफळ देवून व हार घालून सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या पीडीओ लिला मेत्री व सचिव हणमंत किल्लेकर यांच्या हस्ते वयोवृद्धांचा सत्कार करून त्यांनी मतदान प्रक्रियेविषयीची माहिती पत्रके देवून त्यांच्यात जागृती निर्माण केली. यापूर्वी आपण प्रत्येकवेळी मतदान करून आमचा मतदानाचा हक्क बजावला आहे. यापुढे ही संधी आमच्या आयुष्यात मिळेल न मिळेल त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीसाठी मतदान करण्याचे खरे समाधान आम्हाला मिळणार असल्याच्या भावना वयोवृद्धांनी यावेळी व्यक्त केल्या. ग्रामपंचायतीचे कर्मचारी सुरेश शिवणगेकर, चेखोबा कांबळे, प्रकाश कांबळे, ग्रामसेवक उज्ज्वला कांबळे, ग्रंथालय विभागाच्या संपदा काकतकर, अंगणवाडी प्रतिनिधी शिला नाईक, नंदा शिंदे, प्रभावती सुतार, आरती जाधव आरोग्य खात्याच्या आरती लोहार, नंदा पाऊसकर, चंद्रभागा देवलतकर, सुनिता बिजगर्णीकर आदींचा या मोहिमेत सहभाग होता.









