सावंतवाडी
दबाव तंत्राचा वापर टाळण्यासाठी बूथ प्रमुख इंडिया आघाडी ,महायुतीचे घेण्यात यावेत – नाणोसकर
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर जे ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकआणि दिव्यांग जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी बुधवारपासून गावागावात टपाली मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे . या पोस्टल मतदान प्रक्रियेत कोणताही गोंधळ होऊ नये तसेच 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या मतदानाबाबत भारतीय जनता पार्टीच्या आणि सत्ताधिशांकडून दबाव तंत्राचा वापर होऊ शकतो. त्यामुळे याबाबत मतदारांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर यांनी केले आहे.या टपाली मतदान प्रक्रिया पथकात दोन मतदान अधिकारी, मायक्रो ऑब्झर्वेशन, छायाचित्रकार आणि पोलीस या पाच जणांचा समावेश आहे. नाणोसकर म्हणाले की , पोस्टल वोटिंग प्रक्रिया पार पडताना इंडिया आघाडीचे बूथ प्रमुख त्या ठिकाणी घेण्यात यावेत . असे झाल्यास मतदान प्रक्रिया कोणत्याही दबावतंत्राशिवाय पार पाडता येईल असे मत नाणोसकर यांनी यावेळी व्यक्त केले . त्यामुळे महायुती आणि इंडिया आघाडीच्या बूथ प्रमुखांच्या समोर ही प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी अशी मागणी नाणोसकर यांनी केली आहे. दरम्यान ८५ वर्षांवरील आणि दिव्यांग यांचे पोस्टल मतदान त्यांच्या राहत्या घरी करण्याची प्रक्रिया १ मेपासून सुरू झालेली आहे. १ मे ते ४ मे पर्यंत ही मतदानाची प्रक्रिया चालणार आहे. याबाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहन मतदारांना करण्यात आले आहे.









