केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सध्या मध्यप्रदेशच्या विधानसभा निवडणूक प्रचारात स्वत:ला झोकून दिले आहे. मार्च 2020 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या 22 आमदारांना आपल्यासह घेऊन राज्यातील कमलनाथ सरकार पाडविले होते. त्यानंतर हे आमदार त्यांच्यासह भाजपमध्ये समाविष्ट झाले होते. त्यांच्या त्या बहुचर्चित पक्षांतरानंतरची ही प्रथमच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली असल्याचे दिसते.
मध्यप्रदेशचा ग्वालियर-चंबळ विभाग हा शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. या भागात भारताला स्वातंत्र्य मिळविण्यापूर्वी त्यांच्या घराण्याचे राज्य होते. आजही त्यांच्या घराण्याने येथे आपला प्रभाव टिकवून धरला आहे. ज्योतिरादित्य आणि त्यांचे दिवंगत पिता माधवराव यांनी नेहमीच या भागात काँग्रेसला विजयी करण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. त्यांच्या आजी राजमाता विजयाराजे शिंदे आणि त्यांच्या आत्या वसुंधरा राजे यांनी जनसंघ आणि नंतर भाजपला जवळ केले. तर माधवराव आणि ज्योतिरादित्य यांनी काँग्रेसला आपली मानले होते.
परिस्थितीत परिवर्तन
अवघ्या तीन वर्षांपूर्वी काँग्रेसच्या विजयासाठी आकाशपाताळ एक करणारे ज्योतिरादित्य आज भाजपच्या विजयासाठी संपूर्ण राज्यभर प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. प्रतिदिन ते चार ते सहा जाहीर सभांमधून मतदारांशी संवाद साधतात. 2018 च्या निवडणुकीत काँग्रेसला निसटते बहुमत मिळवून देण्यात त्यांचा स्वत:चा आणि त्यांचा प्रभाव असणाऱ्या ग्वाल्हेर-चंबळ भागाचा मोठा वाटा होता. आज याच भागातून भाजपची सरशी करण्यासाठी ते झटत आहेत.
मतदारांना भावनिक आवाहन
‘सरकार बदलकर मैंने ठीक किया या गलत किया’ असा थेट प्रश्न ते जाहीर सभांमधून मतदारांना विचारतात. लोकांमधून अर्थातच ठीक किया असे उत्तर येते. त्यांच्या सभांना प्रतिसाद समाधानकारक मिळताना दिसतो, असे राजकीय निरीक्षकांचेही मत आहे. काँग्रेसने आपल्या प्रदीर्घ सत्ताकाळात प्रचंड भ्रष्टाचार केला आहे, असा थेट आरोप ते करतात. तसेच काँग्रेस नेत्यांचे वाभाडे काढतात.
मधल्या काळात पत्रकारांशी संवाद
दोन प्रचारसभांमधल्या प्रवासात ते पत्रकारांशी संवाद साधतात. काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्यानंतर मतदारांच्या प्रतिसादात काय परिवर्तन जाणवते, असा प्रश्न त्यांना हटकून विचारला जातो. त्यावर, भारतीय जनता पक्ष मला नवा नाही. या पक्षाची स्थापना माझ्या आजी राजमाता विजयाराजे शिंदे यांनीच केली आहे. माझे पिता माधवराव यांनी त्यांच्या राजकीय कार्यकाळाचा प्रारंभ जनसंघातूनच केला होता. नंतर ते काँग्रेसमध्ये आले. त्यामुळे भाजपमध्ये जाणे हा माझ्यासाठी शुभयोगच आहे, असे उत्तर ते देतात. भाजप हा जमिनीवरील लोकांशी जोडला गेलेला पक्ष आहे. काँग्रेस हा उंटावरुन शेळ्या हाकणाऱ्या नेत्यांचा पक्ष आहे. देशाचा आणि राज्यांचा विकास हा भाजपचा ध्यास आहे. तर स्वत:च्या लाभासाठीच राजकारण करणे हा काँग्रेसच्या नेत्यांचा शिरस्ता आहे, असा थेट आरोप ते करतात. एकंदर, त्यांच्यामुळे प्रचाराची रणधुमाळी अधिकच स्वारस्यपूर्ण झाल्याचे पहावयास मिळते. यावेळी काँग्रेसला मतदार धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे. ते खरे ठरते, किंवा नाही, हे मतदारच ठरविणार असून त्याचे उत्तर येत्या 3 डिसेंबरला मिळणार आहे.









