खानापूर ते संगोळ्ळी रायण्णा समाधीस्थळ नंदगडपर्यंत पदयात्रा होणार
खानापूर : अखिल भारतीय काँग्रेसतर्फे देशभरात वोटर अधिकार पदयात्रा अभियान सुरू केले आहे. याला पाठिंबा देण्यासाठी खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे रविवार दि. 17 ऑगस्ट रोजी एआयसीसीच्या सचिव माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली खानापूर शिवस्मारक ते संगोळ्ळी रायण्णा समाधीस्थळ नंदगडपर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे. या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या गलथान कारभाराबाबत मतदान चोरीचा आरोप करून निवडणूक आयोगाच्या संपूर्ण कारभारावर ताशेरे ओढले आहेत.
निवडणूक आयोगाच्या विरोधात देशभर निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, बिहार येथून वोटर अधिकार पदयात्रा सुरू करण्यात आली आहे. मतदान चोरीबाबत सामान्य जनतेत जागृती व्हावी यासाठी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय काँग्रेसच्या या अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे रविवार दि. 17 रोजी सकाळी 7 वाजता शिवस्मारक येथील शिवाजी पुतळ्याला अभिवादन करून पदयात्रेची सुरुवात करण्यात येणार आहे. नंदगड येथील संगोळ्ळी रायण्णा यांच्या समाधी स्थळापर्यंत ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. समाधीस्थळाला अभिवादन केल्यानंतर सभा घेण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, तसेच तालुक्यातील नागरिकांनी या पदयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन ब्लॉक काँग्रेसतर्फे केले आहे.









