वार्ताहर कुडाळ
निवडणूक व मतदान हा लोकशाही राज्यकारभाराचा एक अभूतपूर्व उत्सव आहे. लोकशाहीला बळकटी आणण्यासाठी युवा तरुणांनी मतदार हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी विशाल खत्री यांनी येथे केले. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार कुडाळ आणि संत राऊळ महाराज महाविद्यालय च्या संयुक्त विद्यमाने येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात मतदार नोंदणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, प्रांत अधिकारी ऐश्वर्या काळूशे, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी व तहसिलदार अमोल पाठक, क. म. शि. मं. सरकार्यवाह आनंद वैद्य, निवडणूक नायब तहसीलदार लता वाडकर, प्रभारी प्राचार्य डॉ. व्ही. बी. झोडगे, नीलम पारकर, महसूल सहाय्यक गौरव आरोसकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. भावेश चव्हाण, प्रा. सबा शहा, छात्रसेना सी. टी ओ. डॉ. योगेश कोळी व कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. शिबिरात महाविद्यालयाच्या विविध शाखेतील १५० हून अधिक विद्यार्थी, विद्यार्थीनी मतदार म्हणून आपली नाव नोंदणी पूर्ण केली. शिबिराचे उद्घाटन लोकशाहीरुपी रोपट्याला पाणी घालून करण्यात आले.









