ऑनलाईन टीम / तरुण भारत :
कसबा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी 7 ते 5 यावेळेत कसब्यात 45.25 टक्के मतदान झाले. त्यामुळे एकूणच या मतदानप्रक्रियेत नागरिकांचा निरुत्साहच दिसून आला.
कसबा विधानसभा मतदारसंघांत आ. मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली. प्रामुख्याने या निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीकडून काँगेसचे रविंद्र धंगेकर यांच्यात दुहेरी लढत पहायला मिळाली. धंगेकर मागील 25 वर्षांपासून कसबा मतदारसंघातील विविध प्रभागांमधून निवडून आले आहेत. त्यामुळे कसब्यातील काही भाग सोडला तर बाकी सगळय़ा प्रभागामध्ये धंगेकरांची चांगली पकड आहे. त्यामुळे धंगेकर यांनी भाजपाच्या रासने यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले होते.
या निवडणुकीसाठी 270 मतदान केंद्रांवर हे मतदान घेण्यात आले. सकाळी 7 ते 9 या कालावधीत केवळ 6.5 टक्के मतदानाची नोंद झाली. 9 ते 11 पर्यंत 8.5 टक्के, 11 ते 1 वाजेपर्यंत 18.5 टक्के तर दुपारी 1 ते 3 या वेळेत 30.5 टक्के मतदान झाले. त्यानंतरच्या दोन तासात 14.75 टक्के मतदान झाले. मागील 30 वर्ष कसब्यावर भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे कसब्याचा गड कोण राखणार, हे 2 मार्चच्या निकालात पाहणे महत्वाचे ठरणार आहे.








