केंद्रीय निवडणूक आयोगाचा बैठकीनंतर निर्णय
वृत्तसंस्था नवी दिल्ली
मतदारांचे परिचय कार्ड त्यांच्या आधारकार्डाशी जोडण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. यासंबंधी मंगळवारी येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत केंद्रीय गृहविभाग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. चर्चेनंतर हा निर्णय घेतला गेला.
मतदाराचा परिचय क्रमांक आणि त्याचा आधार क्रमांक एकमेकांशी जोडण्याचे अभियान आता यापुढच्या काळात वेगवान केले जाणार आहे. लोकप्रतिनिधित्व कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेले निर्णय यांच्या आधारावर केंद्रीय निवडणूक आयोग पुढील काळात यासंदर्भात योग्य ती कारवाई करणार आहे. आयोगाला यासंदर्भात अधिकार असून त्यांचे क्रियान्वयन अधिक वेगाने केले जाईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेंद्र कुमार यांनी बैठकीनंतर स्पष्ट केले.
कसे जोडणार क्रमांक…
मतदाराचा परिचय क्रमांक आणि त्याचा आधारकार्ड क्रमांक यांची जुळणी कशी केली जाईल, यासंबंधी नियम ठरविण्यासाठी आधारकार्ड विभाग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या तज्ञांची त्वरित बैठक बोलाविण्यात येणार आहे. या बैठकीत या जुळणीच्या तांत्रिक बाबींसंबंधी विचार करण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रिया लवकरात लवकर व्हावी, यासाठी निवडणूक आयोग प्रयत्न करणार आहे.
कारण काय
मतदाराचा मतदार परिचय क्रमांक आणि त्याचा आधारकार्ड क्रमांक एकमेकांना जोडल्याने मतदारसूची तयार करताना सोयीचे होणार आहे. तसेच मतदाराजवळ एकापेक्षा अधिक मतदान परिचयपत्रे असण्याचा प्रश्नही पूर्णत: संपणार आहे. भारताच्या घटनेनुसार मतदानाचा अधिकार केवळ भारतीय नागरिकालाच मिळू शकतो. आधारकार्ड केवळ व्यक्तिगत परिचयाचे कार्ड असते. त्याचा भारतीय नागरिकत्वाशी संबंध नसतो. आधारकार्ड हा नागरिकत्वाचा पुरावा मानण्यात येत नाही. तथापि, मतदार परिचय पत्र हा नागरिकत्वाचा पुरावा मानला जातो. त्यामुळे या दोन्ही क्रमांकांची जुळणी केल्याने बनावट मतदारांचा प्रश्नही सुटणार आहे. त्यामुळे या क्रमांकांची जुळणी करण्याविषयी निवडणूक आयोग आग्रही आहे. केंद्रीय गृहविभागानेही यासंबंधात केंद्रीय निवडणूक आयोगाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतल्याने आता पुढच्या काळात मतदार परिचय क्रमांक आणि त्याचा आधारकार्ड क्रमांक यांची जोडणी करण्याचे कार्य वेगाने हाती घेतले जाईल. मतदारसूची ‘शुद्ध’ करण्यासाठी या जोडणीचा उपयोग होणार आहे. निवडणूक आयोगाच्या या पावलाचे स्वागत सर्वत्र करण्यात येत आहे.









