न्यायाधीश टी. एन. इनवळ्ळी : राष्ट्रीय मतदार दिन : युवा मतदारांना मतदान ओळखपत्र वितरण
प्रतिनिधी/ बेळगाव
बलशाली राष्ट्र निर्माणात युवकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. मतदानकाळात आमिषांना बळी न पडता किंवा पक्षपात न करता मतदानाचा हक्क बजावावा. जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था असलेला देश भारत असून देशाची शान राखण्यासाठी, प्रबळ राष्ट्रनिर्मितीसाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रधान जिल्हा-सत्र न्यायाधीश टी. एन. इनवळ्ळी यांनी केले.
जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. 25 रोजी कुमार गंधर्व रंगमंदिरच्या मंचावर 15 वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन करून न्यायाधीश इनवळ्ळी बोलत होते.
मतदान करणे हा घटनात्मकरीत्या प्रत्येकाला मिळालेला हक्क आहे. त्यामुळे घटनेने दिलेला हक्क बजावणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. मतदान करून योग्य व्यक्तीला निवडून देऊन पारदर्शक राज्य कारभार चालविणे मतदारांच्या हाती आहे. त्यामुळे मतदानाचे महत्त्व प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. 18 वर्षांवरील प्रत्येकाने घटनात्मकरीत्या मिळालेला मतदानाचा हक्क बजावावा, असे इनवळ्ळी म्हणाले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी मतदानाचे महत्त्व सांगितले. आपल्या भागाचा विकास घडवून आणण्यासाठी, समर्थ नेतृत्व सत्तेवर आणण्यासाठी मतदान उपयोगी ठरते. मतदान ही शक्ती असून याचे महत्त्व समजून घेत मतदान प्रक्रियेत प्रत्येकाने भाग घेतला पाहिजे, असे ते म्हणाले. मतदानाचा हक्क व कर्तव्य यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी एक शायरीही ऐकविली, “वोट तुम्हारा शक्ती बडी, इसे ना व्यर्थ गवाना, देश की तकदीर हैं, इसमें अपनी तकदीर बदलना, एक एक वोट से बनती बदलाव की तस्वीर, सोच समझकर चुनो नेता, ये हैं लोकतंत्र की” या शायरीवर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, महापालिका आयुक्त शुभा बी., वरिष्ठ अधिकारी गीता कौलगी, जि. पं. योजना संचालक रवी बंगरेप्पन्नावर, महापालिका आयुक्त उदयकुमार तळवार, रेश्मा तालीकोटी, पदवीपूर्व शिक्षण खात्याचे उपसंचालक कांबळे यासह विविध खात्यांचे अधिकारी, कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.
याच वेळेला युवा मतदारांना मतदान ओळखपत्राचे वितरण करण्यात आले. मतदार नोंदणी कार्य उत्कृष्टपणे केलेल्या बीएलओ व शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित विविध स्पर्धांतील विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर ‘ना भारत’ यावर लघुपट दाखविण्यात आला. त्यानंतर मतदार दिन शपथ वदवून घेण्यात आली.
तत्पूर्वी मतदार जागृती कार्यक्रम झाला. जिल्हाधिकारी कार्यालयातून सकाळी 10 वाजता जागृती फेरीला सुरुवात झाली. कित्तूर चन्नम्मा चौक, जिल्हा रुग्णालयमार्गे कुमार गंधर्व रंगमंदिर आवारात जागृती फेरीचा समारोप करण्यात आला.









