80 वर्षांवरील मतदार, दिव्यांग मतदानांना घरबसल्या करता येणार मतदान : 6 मे पर्यंत चालणार प्रक्रिया
प्रतिनिधी/ बेंगळूर
विधानसभेच्या 224 मतदारसंघांमध्ये 10 मे रोजी मतदान होणार आहे. तर 13 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. मात्र, शनिवारपासूनच म्हणज 29 एप्रिलपासून मतदान प्रक्रिया सुरू होईल. 29 एप्रिल ते 6 मे पर्यंत राज्यभरात बॅलेट पेपरद्वारे मतदान होणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रथमच कर्नाटकामध्ये 80 वर्षांवरील मतदार, दिव्यांग मतदारांसाठी घरबसल्या मतदान करण्याची सोय केली आहे. त्यांना शनिवारपासून आठ दिवस घरातून मतदान करता येणार आहे. उर्वरितांना 10 मे रोजी मतदान केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावता येईल.
कसे होणार मतदान…
निवडणूक आयोगाचे कर्मचारी 80 वर्षांवरील मतदार आणि दिव्यांग मतदारांना त्यांच्या दारातच बॅलेट पेपर देतील. या ठिकाणी गुप्त पद्धतीने मतदान होईल. यावेळी तेथे स्थानिक पोलिसही उपस्थित राहणार आहेत. शिवाय या प्रक्रियेचे चित्रिकरण केले जाईल. मतदानानंतर मतपेट्या स्ट्राँग रुममध्ये सुरक्षित ठेवल्या जातील. बॅलेट पेपरद्वारे झालेल्या मतपत्रिकांची मोजणीही 13 मे रोजी होईल. त्या दिवशीच मतपेट्या उमेदवार किंवा त्यांच्या निवडणूक एजंटांच्या उपस्थितीत उघडल्या जातील.









