म. ए. समितीचे नगरसेवक रवी साळुंखे यांची मागणी
बेळगाव : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर मराठीचा विषय पत्र देऊनही घेतला गेला नाही. याबाबत म. ए. समितीचे नगरसेवक रवी साळुंखे यांनी महापौर मंगेश पवार यांना जाब विचारला. त्यावर तुम्हाला वेळ देतो त्यानंतर बोला असे म्हणत साळुंखे यांना गप्प करण्यात आले. यानंतर महसूल उपायुक्त यांच्या विरोधात मतदान घेऊन ठराव पास करण्याची मागणी सत्ताधारी गटाच्यावतीने करण्यात आली. याचप्रमाणे महापालिकेत मराठी पाहिजे की नको, यावरही मतदान घेण्यात यावे, अशी जोरदार मागणी साळुंखे यांनी केली. यावरून काहीवेळ सभागृहात शाब्दिक खडाजंगी झाली.
गुरुवारी दुपारी महापालिकेच्या मुख्य सभागृहात सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली. महसूल विभागाकडून नागरिकांची कामे करून देण्यास विलंब होत आहे. अनेक गैरप्रकार घडत आहेत. एखादे काम करून देण्यास पैशाची मागणी केली जात आहे. त्यामुळे महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांच्या बदलीचा ठराव पारित करण्यासाठी मतदान घेण्यात यावे, अशी मागणी सत्ताधारी गटाच्यावतीने करण्यात आली.
याचप्रमाणे महानगरपालिकेत आपली मातृभाषा मराठी पाहिजे की नको, यावरही मतदान घेण्यात यावे, अशी मागणी रवी साळुंखे यांनी सभागृहात केली. महापालिकेत आम्ही नसलो किंवा असलो तरी विकास हा होतच राहणार. पण मराठी भाषा महत्त्वाची आहे, असे मत व्यक्त केले. यानंतर सरकार नियुक्त सदस्य रमेश सोंटक्की यांनी रवी साळुंखे यांना घेरण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात कन्नड भाषेतून व्यवहार केला जातो का? अशी विचारणा केली.
याबाबत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या मुख्य सचिवांची बैठक बोलाविण्यात यावी, अशी मागणी केली. कोल्हापूर व सोलापूरचे बोलायचे सोडून देऊन बेळगावबद्दल बोला, असा प्रतिटोला साळुंखे यांनी लगावला. तत्पूर्वी रवी साळुंखे यांनी मराठीचा विषय सर्वसाधारण बैठकीच्या अजेंड्यावर घेण्यात यावा, याबाबतचे पत्र महापौरांना दिले होते. पण तो विषय अजेंड्यावर का घेण्यात आला नाही? अशी विचारणा करण्यात आली. या विषयावर बोलण्यासाठी तुम्हाला वेळ देतो, असे म्हणत महापौर मंगेश पवार यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.









