ऑनलाईन टीम / तरुण भारत :
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी मतदान होणार आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत महाराष्ट्र एकीकरण समितीच्याच उमेदवारांना मतदान करा, असं जाहीर आवाहन कर्नाटकातील मराठी मतदारांना केलं आहे.
राज ठाकरेंनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत एकजुटीने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनाच मतदान करा. इतर पक्षांचे उमेदवार मराठी असले तरी ते निवडून आल्यावर मराठी भाषेच्या गळचेपी विरोधात किंवा मराठी माणसांवर सीमाभागात होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात विधानभवनात तोंड उघडणार नाहीत. तिथलं सरकार जर मराठी माणसांना त्रास देणार असेल, मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न करणार असेल तर ते हे खपवून घेतलं जाणार नाही.
मध्यंतरी जेव्हा पुन्हा एकदा सीमावदाला कर्नाटक सरकारकडून खतपाणी घालून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला गेला होता, तेव्हा मी म्हणलो होतो की, कर्नाटक आणि महाराष्ट्रात मुळात एकजिनसीपणा आहे. इथल्या अनेकांची कुलदैवतं ही कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं ही महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. तेंव्हा खरंतर कर्नाटक सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली तर संघर्षाची वेळच येणार नाही. पण कुठल्याही पक्षाचं सरकार तिकडे येऊ दे त्यांच्या वागण्यात यत्किंचितही फरक नसतो. म्हणूनच तिथल्या विधानभवनात मराठी भाषिक आमदार, जो त्या भागातील मराठी अस्मितेचं प्रतिनिधित्व करेल, मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवेल अशी लोकं असायला हवीत.
ह्यासाठी सीमाभागातील लोकांना १० मे ला संधी आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदारच निवडून येतील हे तुम्ही पाहायला हवं, हे तुमच्या आणि पर्यायाने मराठी भाषेच्या हिताचं आहे. ही संधी दवडू नका, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.